यवतमाळ : येथील ‘रेमंड’ कंपनीतील कामगारांचा सुरू असलेला संप बेकायदेशीर असून वेतनवाढीचे प्रकरण औद्योगिक न्यायालयात प्रलंबित आहे. तरी देखील कामगारांनी संप पुकारला आहे, ही बाब बेकायदेशीर असल्याचे मत रेमंड युको डेनिमचे एचआर प्रमुख चंद्रशेखर पातुरकर यांनी स्पष्ट केले.ते रेमंडच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी रेमंडचे प्लाँट हेड नितीन श्रीवास्तव उपस्थित होते असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.
रेमंडच्या कर्मचार्यांनी बुधवारपासून येथील आझाद मैदानावर बेदमुत उपोषण सुरू केले आहे. मान्यताप्राप्त संघटनेने रेमंडच्या व्यवस्थापनासोबत हातमिळवणी केल्याने कर्मचार्यांवर अन्याय होत आहे, त्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न सुटताना दिसत नाही, त्यामुळे हे उपोषण सुरू केल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. मात्र कामगारांचा हा संपच बेकायदेशीर असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. कंपनीला २८० कोटींचा तोटा असून कंपनीवर ४०० कोटींचे कर्ज आहे. यंदाचा अंदाजित तोटा हा ६० कोटींच्या घरात असेल, असे पातुरकर म्हणाले. कामगारांच्या वेतनवाढीशी संबंधित करार हा १ एप्रिल २०२४पासून प्रलंबित आहे. कोवीडनंतर कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे, असे पातूरकर यांनी सांगितले. कर्मचारी म्हणतात त्या पद्धतीने वेतनवाढ देणे शक्य नाही.
कर्मचार्यांना आमचा प्रस्ताव मान्य नसल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. त्यांनी न्यायालयीन आदेशाची अवहेलना केली आहे. शिवाय, संप करून कंपनीचे आर्थिक नुकसान केले आहे. सर्व एक हजार ७९० कर्मचारी संपावर आहेत. अत्यावश्यक सेवा असलेल्या विभागातील कर्मचारीही संपावर आहेत. त्यामुळे कंपनीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कर्मचार्यांनी कंपनीचे व स्वत:चे हित विचारात घेवून कामावर हजर व्हावे. वेतनवाढीबाबत चर्चेतून तोडगा काढता येईल, असे मत याप्रसंगी एचआर प्रमुख चंद्रशेखर पातुरकर यांनी व्यक्त केले.
म्हणून उपोषण…
कर्मचार्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने उपोषण करण्याची वेळ आल्याची माहिती कामगार नेते राजीव तांड्रा यांनी उपोषणस्थळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी तांड्रा यांनी रेमंडचे अधिकारी नितीन श्रीवास्तव आणि चंद्रशेखर पातुरकर हे कामगारांवर अन्याय करीत असल्याने त्यांची येथून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी देखील केली. या दोन अधिकार्यांना हटविल्यास आम्ही बिनशर्त कामावर रुजू होण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कामगार अधिकारी राहुल काळे यांनी भेट दिली असून जिल्हाधिकार्यांनी चर्चेसाठी बोलावले आहे. या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक कामगारांचे कुटुंबीय उपोषण मंडपात ठिय्या देऊन बसले आहेत. रेमंड व्यवस्थापनाने हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे ठरवत कामगार संघटनांना नोटिसा बजावल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
