संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा

  • राज्य कामगार विमा महामंडळाचा महत्वाचा निर्णय
  • संगमनेर तालुक्यातील बंद करण्यात आलेले दवाखाने पुन्हा सुरु
  • सुमारे १० हजार विमाधारक कामगारांना दिलासा

संगमनेरतालुक्यातील सुमारे १० हजार विमाधारक कामगारांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत यापूर्वी बंद करण्यात आलेले दवाखाने आता पुन्हा सुरू होणार आहेत असे वृत्त नवराष्ट्र वृत्तसंस्थेने दिले आहे.

आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, ठोस मांडणी आणि शासनस्तरीय समन्वयामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय शक्य झाला आहे.

कामगार राज्य विमा महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, संगमनेर येथे दवाखाने तात्काळ सुरू करण्याच्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत. संगमनेर परिसरात विमाधारक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने, स्थानिक पातळीवर दर्जेदार व तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक होते. कामगार व खासगी उद्योगांची होती मागणी

या निर्णयामुळे विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना औषधोपचार, तपासण्या व अन्य आरोग्यसेवांसाठी आता शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची मोठी बचत होणार आहे.

या संदर्भात समाधान व्यक्त करताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर येथे कामगार विमा योजनेअंतर्गत दवाखाना सुरू व्हावा, अशी मागणी कामगार संघटनांमार्फत तसेच खासगी उद्योग समूहांकडून सातत्याने होत होती. नगरपालिका निवडणुकीच्या काळात शहरातील मालपाणी उद्योग समूहातील कामगारांच्या बैठकीत आपण याबाबत शब्द दिला होता, तो आज पूर्ण होत आहे.

नागपूर अधिवेशनात निर्णायक बैठक

या विषयावर नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक झाली होती. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाने सकारात्मक निर्णय घेत संगमनेरमध्ये दवाखाने सुरू करण्यास मान्यता दिल्याबद्दल आमदार खताळ यांनी संबंधित सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

कामगारांकडून आमदार अमोल खताळ यांचे आभार

ज्या कामगारांच्या वेतनातून नियमितपणे कामगार विम्याची रक्कम वजा केली जाते, त्या सर्व कामगारांना या दवाखान्याचा थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील संघटित तसेच असंघटित कामगार वर्गातून आमदार अमोल खताळ यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. दवाखाने सुरू झाल्यानंतर कामगार वर्गाला दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.