वाडा : तालुक्यातील उसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या श्रीदत्त इंटरप्रायझेस या कंपनीत रिॲक्टरचा स्फोट झाला. या अपघातात चार कामगार गंभीररीत्या भाजले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.ही घटना बुधवारी (ता. २१) रात्री घडली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत विश्वकर्मा (वय ४०) या कामगारावर ठाणे येथे तर सुदामा (वय २१), भाईलाल (वय ३२) भगवान दास (वय ३५) या कामगारावर अंबाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
तालुक्यातील उसर येथे श्रीदत्त इंटरप्रायझेस ही कंपनी आहे. या कंपनीत जुने टायर जाळून त्यातून ऑइल आणि तारा यांचे उत्पादन घेतले जाते. बुधवारी रात्री काम सुरू असताना रिॲक्टरचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यात चार कामगार गंभीररीत्या भाजले. यातील भागवत हा कामगार गंभीररीत्या भाजल्याने त्याला सर्वप्रथम अंबाडी येथे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरित कामगारांवर अंबाडी येथे उपचार सुरू असून, चौघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
वाडा तालुक्यात सुमारे ७७ कंपन्या आहेत. यातील अनेक कंपन्यांना बंदच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, कंपनीमालक रात्री राजरोसपणे कंपन्या चालवत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या महिन्यापूर्वी लखमापूर येथील एका टायर कंपनीत असाच एक स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. वाडा पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

