छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुडइयर टायर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील ६६३ कायमस्वरूपी कामगारांसाठी ऐतिहासिक असा वेतनवाढीचा करार मंजूर झाला. कंपनी व्यवस्थापन व मुंबई श्रमिक संघाचे कामगार नेते यांच्यात झालेल्या बैठकीत २५,४०० रुपयांच्या विक्रमी पगारवाढीला मंजुरी दिली. यामुळे कामगारांचा पगार १ लाख १३ हजारांपर्यंत, तर सीटीसी पगार १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त झाला आहे. गुडइयर टायर्सचे कामगार देशातील टायर उद्योगातील सर्वाधिक वेतन घेणारे कामगार ठरले आहेत. या पगारवाढीच्या करारानंतर कामगारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
सीटू संलग्न, मुंबई श्रमिक संघाशी संलग्न असलेल्या या कामगारांच्या वेतनवाढीसाठी १ जानेवारी २०२५ पासून सुरू असलेल्या चर्चेला तब्बल ११ महिन्यांनंतर यश मिळाले. करारावेळी मुंबई श्रमिक संघातर्फे अध्यक्ष डॉ. विवेक माँटेरो, जनरल सेक्रेटरी हेमकांत सामंत, उपाध्यक्ष सईद अहमद, सचिव राजेंद्र देवकर, गुडइयर युनिटतर्फे अध्यक्ष अर्जुन पिटेकर, जनरल सेक्रेटरी राजेंद्र देवकर, उपाध्यक्ष शंकर पाटील, काशिनाथ साळुंखे, जॉइंट सेक्रेटरी राजू शिंदे, खजिनदार दिगंबर गायके, सदस्य शिरीष कामळजकर, विठ्ठल कोळेकर उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापनातर्फे एम.डी. जेफ्री व्हाइटली, एचआरप्रमुख सुभाष झा, एचआर मॅनेजर प्रदीप अग्रवाल, ऑडक्शन हेड राजू गायकवाड, क्वालिटी हेड प्रकाश कोणाकाला, इंजिनिअरिंग हेड सुधाकर मुहुल, फायनान्स हेड अंजन सतपती आदींची उपस्थिती होती.
कराराची वैशिष्ट्ये :-
करार कालावधी ३६ महिने (३ वर्ष)
दोन टप्प्यांत पगारवाढ पहिला टप्पा (१८ महिने) : १८,००० रुपये, दुसरा टप्पा (१२ महिने): ७,४०० रुपये
नवीन कामगारांचा महागाई भत्ता प्रत्येक पॉइंटला १ पैसा वाढ,
फेस्टिव्हल ॲडव्हान्स : ३०,००० रुपये
२५ वर्षे सेवा पूर्ण केल्यास ३०,००० रुपये सर्व्हिस अवॉर्ड
शैक्षणिक/लग्न खर्चासाठी १,७५,००० रुपये बिनव्याजी ॲडव्हान्स
कामगारांना ग्रुप मेडिकल पॉलिसी
निवृत्त कामगारांना कायदेशीर रकमेव्यतिरिक्त १,२५,००० रुपये कंपनीकडून अतिरिक्त
गंभीर आजारावर २ लाख रुपये मदत १०० दिवस मिळणार अर्धा पगार
मृत कामगारांच्या वारसांना सरासरी ३५ लाखांची आर्थिक मदत
नवीन भरतीत नातेवाइकांना प्राधान्य, कराराच्या काळात निवृत्त झालेल्यांना थकबाकी देणार

