मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांची पेमेंट वाढ व सुट्ट्यांचे वेतन देण्याची मागणी- रस्ता रोको, मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन

आंदोलनामुळे नागरिकांना नेटवर्कचा त्रास होण्याची शक्यता

अहिल्यानगर - महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने राज्यातील सर्व मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, बोनस आणि सुट्ट्यांच्या वेतनाची मागणी करत अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बायपास येथे रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

     या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव समीर शेख, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. श्रीरंग गिते, तसेच सोपान शिंदे, रवी काकडे, बाबासाहेब गायकवाड, शामसुंदर जाधव, अश्फाक शेख, नारायण पाटील, किरण निकम आदी पदाधिकारी  मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

     असोसिएशनच्या मते, अल्टीअस, पीटीपीएल, आयडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसह विविध मोबाईल टॉवर कंपन्यांमध्ये कार्यरत तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून योग्य पगारवाढ देण्यात आलेली नाही. उलट, कामाच्या वाढत्या ताणामुळे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दरमहा 500 ते 6000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच वर्ष 2025 मधील सर्व रजा व राष्ट्रीय सुट्ट्यांचे सुमारे 11,400 रुपयांचे वेतन अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली. 

    दि.11 ऑक्टोबर 2025 रोजी संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिवाळीपूर्वी बोनस आणि सुट्टीचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते अद्याप दिलेले नसल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

     संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाहीत तर राज्यभरातील सर्व मोबाईल टॉवर कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या मोबाईल नेटवर्कवर होणार आहे.

     पुणे लेबर कमिशनर यांच्या हस्तक्षेपानंतरही संबंधित कंपन्यांनी मागण्या न मानल्यामुळे आता असोसिएशनकडून सर्व जिल्ह्यांत तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर म्हणाले, “आमच्या मागण्या कायदेशीर आणि न्याय्य आहेत. कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. कंपनीने लवकरात लवकर थकबाकी व पेमेंटवाढ अमलात आणावी, अन्यथा महाराष्ट्रभर नेटवर्क सेवांवर परिणाम होणार.