शासनाने कामगार क्षेत्रातील सर्व महत्त्वाची माहिती, मार्गदर्शन आणि सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी नवी वेबसाईट सुरू केली आहे. कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते मंगळवारी या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.
राज्य शासनाच्या दीडशे दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत कामगार विभागाने ही वेबसाईट विकसित केली आहे. https://labour.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर कामगार कायदे, नोंदणी प्रक्रिया, कल्याण योजना, तसेच औद्योगिक सुरक्षा आणि कामगार कल्याणासंबंधी आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.
याचबरोबर कामगार विभागाने तयार केलेल्या आधुनिक 'चॅट बोट'ला 'श्रमदूत' असे नाव देण्यात आले असून, त्याद्वारे कामगार आणि कारखानदारांना त्वरित मार्गदर्शन आणि सहाय्य मिळणार आहे. ही सेवा दिव्यांग व्यक्तींनाही सहज वापरता येईल, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव दीपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे. मंत्री ॲड. फुंडकर यांनी वेबसाईट वापरण्यास सुलभ आणि सर्वसमावेशक ठेवण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. राज्यातील कामगार आणि औद्योगिक क्षेत्रासाठी ही वेबसाईट नव्या युगाची सुरुवात ठरेल, असा विश्वास कामगार मंत्रालयाने व्यक्त केला आहे.