राज्यातील वीज क्षेत्रातील कायमस्वरूपी कामगार या आठवड्यात 3 दिवसांच्या संपावर जाणार असून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदुर संघाच्या प्रदेश कार्यकारिणीतर्फेही या संपाला पाठिंबा देण्यात आला आहे.
तसेच राज्यातील सर्व कंत्राटी वीज कर्मचारीही त्यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी दिली आहे.
९ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कामगार संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आलेल्या साध्या मूलभूत बाबींची पूर्तताही आजपर्यंत झालेली नाही. यामुळे तुटपुंज्या वेतनात अहोरात्र काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा रोष अधिकच वाढल्याची माहिती कामगार संघटनेतर्फे देण्यात आली.
तसेच वीज कंत्राटी कामगार हा वीज उद्योगाचा कणा असूनही त्यांच्याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही, त्यांना विश्वासात घेत नाही, अगदी साध्या मागण्या मान्य करण्यातही टाळाटाळ केली जात असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच कायमस्वरुपी वीज कामगार संघटनेने 9,10 आणि 11 ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या संपाला वीज कंत्राटी कामगार संघाने पाठिंबा जाहीर केल्याचे कंत्राटी कामगार संघटनेने स्पष्ट केले आहे.
तर संघटनेच्या वतीने प्रशासनाला पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे की, कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात यावी. अन्यथा ९ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार काळी फीत लावून आंदोलन सुरू करतील. तर १० ऑक्टोबरपासून दुपारी १.३० वाजल्यापासून कायमस्वरुपी कामगारांसोबत कामबंद आंदोलनाला सुरुवात होईल. यामुळे राज्यातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी वीज कंपनी प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
तर राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस या विषयी नक्कीच योग्य तोडगा काढून त्यांच्या खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.