रांजणगाव (पुणे) : येथील लोकेश मशीन कंपनीतील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीर कामगार कपात, कंपनीचे नाव बदलून नव्या कामगारांच्या नेमणुकीस विरोध दर्शवित ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवगर्जना कामगार संघटनेमार्फत करण्यात आले असून शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, कंपनीत संघटना स्थापन झाल्यानंतर कामगारांवर सतत दबाव आणला गेला. हैदराबाद येथे बदलीचा आग्रह, बेकायदेशीर lay-off आणि अखेरीस retrenchment या टप्प्यांतून कामगारांना हटविण्यात आले. त्यानंतर कंपनीचे नाव बदलून त्याच जागी, त्याच यंत्रसामग्रीसह उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, जुन्या कामगारांना वगळून नव्या कामगारांची नेमणूक करण्यात आली.
औद्योगिक विवाद कायदा १९४७ नुसार कंपनी पुन्हा सुरू होत असेल तर पूर्वी कमी केलेल्या कामगारांना पुन्हा नोकरीवर घेणे बंधनकारक आहे. पण व्यवस्थापनाने कायद्याचे उल्लंघन करत जुन्या कामगारांना नोकरीपासून वंचित ठेवले आहे, असा ठपका संघटनेने ठेवला आहे.
या अन्यायाविरोधात कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसह रांजणगाव MIDC येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी दि.१५ तारखेला कंपनी वरिष्ठ यांच्यासोबत पुण्यामध्ये मीटिंग ठेवण्यात आली आहे जर ह्या मीटिंग मध्ये तोडगा निघाला नाही तर सर्व कामगारांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.