जे.सी.बी. (JCB) कंपनीच्या बडतर्फ कामगाराचा आमरण उपोषणाचा इशारा

पुणे : जेसीबी कामगार संघटनेचे माजी जनरल सेक्रेटरी श्री सलीम शेख या कामगारास गैरवर्तनाच्या नावाखाली शिक्षा म्हणून दिनांक 22-09-2025 रोजी नोकरीतून काढून टाकले आहे. सदरची कारवाई रद्द करून त्यांना त्वरित कामावर रुजू करून घेण्याची मागणी श्री सलीम शेख यांनी जे.सी.बी.(JCB) कंपनी व्यवस्थापनाकडे केली असून त्यांची सदर मागणी व्यवस्थापनाने मान्य न केल्यास सदर मागणी मान्य करून घेण्याकरिता ते दिनांक 13-10-2025 रोजी पासून त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यासह कंपनी प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे सदर पत्राद्वारे त्यांनी कंपनी व्यवस्थापनास कळवले असल्याबाबत माहिती श्रमिक एकता महासंघाच्या वतीने सांगण्यात आले.

       विशेष बाब म्हणजे त्यांना काढून टाकण्या अगोदर नोकरीचा राजीनामा देऊन नव्याने मॅनेजमेंट स्टाफ मध्ये बढती देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने श्री सलीम शेख यांना देण्यात आला होता, सदरचा व्यवस्थापनाचा प्रस्ताव नाकारल्याने दिनांक 22-09 -2025 रोजी रात्री 10 वाजता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे अशी माहिती महासंघाच्या वतीने देण्यात आली.

        श्री सलीम शेख हे जे.सी.बी. कामगार संघटना स्थापन करण्यापासून सक्रिय होते तसेच त्यांनी संघटनेचे दोन टर्म जनरल सेक्रेटरी पद भूषविले असून वेतन वाढीचे दोन करार त्यांच्या सहभागाने झाले आहेत.

        श्री सलीम शेख यांनी न्याय मिळवण्यासाठी त्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली तर त्यांच्या सदर आंदोलनास श्रमिक एकता महासंघाच्या संलग्न संघटनांचा त्यांना पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा असेल तसेच जागतिक पातळीवर कार्यरत असलेली जगातील मोठी कामगार संघटना (Industri all Global Union) इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियनचा सुद्धा सदर आंदोलनास पाठिंबा मिळविला जाईल इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियनच्या माध्यमातून जे.सी.बी. (JCB) च्या मुख्य कंपनीतील युनियनचा सुद्धा पाठिंबा घेतला जाईल व त्या माध्यमातून श्री सलीम शेख यांचे आंदोलन जागतिक पातळीवर घेतले जाईल याबाबत श्रमिक एकता महासंघाच्या कार्यकारणीची बैठक झाली असून तसा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती महासंघाच्या वतीने देण्यात आली.