'सुल्झर पंप्स् इंडिया प्रा.ली.’ कंपनी मध्ये कामगारांना 2 लाख रूपयांहून अधिक बोनसचे वाटप

नवी मुंबई : दिघा येथे ‘सुल्झर पंप्स् इंडिया प्रा. लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीने आपली सहा आकडी बोनस देण्याची परंपरा कायम राखत कामगार कर्मचाऱ्यांना 2 लाखाहून अधिक बोनस दिला आहे. या कंपनीमध्ये दिवाळीतला बोनस हा कराराप्रमाणे गणेशोत्सवापुर्वीच दिला जातो.

    ‘सुल्झर पंप्स् इंडिया एम्प्लाॅईज युनियन’ (सेऊ) या अंतर्गत संघटनेचे अध्यक्ष श्री. रुपेश पवार व जनरल सेक्रेटरी श्री. प्रमोद लोटणकर यांच्या नेतृत्वाखाली हा बोनस वाटप करण्यात आला. दि. ९  ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या वेतनवाढ व बोनस कराराप्रमाणे कंपनीने कामगारांना २०२४ सालाचा,  दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी  बोनस वाटप केला. जागतिक पातळीवर युद्धजनक परिस्थितीमध्ये आंतराष्ट्रीय स्तरावर पंपाच्या  मागणी मध्ये घट झाली असतांना सुद्धा अध्यक्ष श्री. रूपेश पवार यांच्या सेऊ संघटनेच्या कामगारांना कमाल बोनस रूपये २,४३,३११/- ( दोन लाख त्रेचाळीस हजार तीनशे अकरा रूपये) तर किमान बोनस रूपये २,२५,२३९/- ( दोन लाख पंचवीस हजार दोनशे एकोणचाळीस रूपये ) देण्यात आला.

    महाराष्ट्रात एक गणपती उत्सव व एक दिवाळी उत्सव हे दोन सण मोठ्याप्रमाणात साजरे केले जातात. पूर्वी गणेशोत्सव हा कोकणात जास्त प्रमाणात साजरा केला जायचा व तो आत्ताही साजरा केला जातो. पण हल्ली संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातही बहुतेक राज्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. सुल्झर पंप्स कंपनीमध्ये सेऊ संघटनेच्या मागणी नुसार दिवाळीचा बोनस हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दिला जातो. त्यामुळे करारा प्रमाणे बोनस हा गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर दिला जातो असे संघटनेचे अध्यक्ष श्री. रुपेश पवार यांनी सांगितले. 

    ‘सुल्झर पंप्स् इंडिया एम्प्लाॅईज युनियन’ (सेऊ)  या संघटनेने केलेल्या कराराप्रमाणे वाटप झालेला बोनस हा येणाऱ्या नवीन कामगार बंधुंसाठी खुप प्रेरणादायक असेल असे मत बहूतेक कामगार बंधुंनी मांडले. बोनस वाटपाच्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री. रुपेश पवार यांनी सर्व कामगार बांधवांना भरगोस बोनस झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व बोनसच्या रकमेचा योग्य वापर करा असा सल्ला दिला.

    ‘सुल्झर पंप्स् इंडिया एम्प्लाॅईज युनियन’ (सेऊ) संघटनेच्या कामगार कर्मचाऱ्यांनी सेऊ कमिटीचे व सुल्झर पंप्स कंपनीच्या व्यवस्थापनाचे खुप खुप आभार मानले.