कारखान्यांना फायर ऑडिट आणि सुरक्षेच्या उपाययोजना बंधनकारक – कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई : कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील सर्व कारखान्यांनी फायर ऑडिट करणे आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजना करणे बंधनकारक आहे, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत (दि. १०) सांगितले.

    नाशिक जिल्ह्यातील मुंडेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स या कारखान्यात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्य नाना पटोले, सरोज अहिरे, राजेश बकाने, अमित देशमुख  राम कदम यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. फुंडकर बोलत होते.

    मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल.

    जिंदाल पॉलिफिल्म्स या कारखान्यात गेल्या अडीच वर्षांत दोनदा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र कारखाना पूर्णपणे बंद केल्यास हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, हे लक्षात घेऊन अपघात झालेला भाग तातडीने बंद करून आवश्यक सर्व दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    प्रत्येक कारखान्यात नियमित फायर ड्रील (रंगीत तालिम), सीआयएस प्रणालीद्वारे तपासणी केली जाते. कोणत्याही कारखान्याला फायर ऑडिट शिवाय परवाना दिली जात नाही, कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे जीवन सुरक्षित राहावे यासाठी शासनाने सुरक्षेचे कठोर निकष लागू केले असून, त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जात आहे, असेही कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.