चिंचवड : एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ३१ कामगारांच्या बडतर्फीविरोधात सुरू असलेले धरणे आंदोलन ९० व्या दिवशीही सुरू आहे. व्यवस्थापनाच्या वेळकाढू धोरणांविरोधात कामगारांनी बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रसंगाचा मागोवा
१४ मे २०२२ रोजी ३३५ कायमस्वरूपी कामगारांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सभासदत्व स्वीकारल्यानंतर व्यवस्थापनाने सुडबुद्धीने कारवाई करत ३१ कामगारांना बडतर्फ केले. त्यातील १० जणांची हरियाणातील बावळ येथे बदली करण्यात आली.
कामगारांचे आरोप
स्थानिक कामगारांना हटवून उत्तर प्रदेश व बिहारसारख्या परराज्यातील कंत्राटी कामगार भरले जात आहेत.
पुणे कामगार आयुक्त कार्यालयाने कंत्राटी कामगारांच्या बाबत इन्स्पेक्शन करून कंपनीवर मोरवाडी सिव्हिल कोर्टात सुमारे ५२ खटले दाखल केले आहे.
गेल्या ३४ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने बडतर्फ कामगारांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
व्यवस्थापनाच्या वेळकाढू धोरणामुळे ५५ वर्षीय कामगार अजित रसाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
आंदोलनाचा पुढील टप्पा
यापूर्वी विविध पातळ्यांवर चर्चा झाल्या असल्या, तरी व्यवस्थापनाने चार वेळा आश्वासन देऊनही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे १८ डिसेंबर २०२४ पासून दहा कामगार बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत.
"जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही," असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. कामगारांचा न्यायाचा प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्थापनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
आंदोलकांची प्रतिक्रिया
शैलेश कुटे (आंदोलक): "आम्ही न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, पण अन्याय सहन करणार नाही. प्रशासन आणि कंपनीने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संघर्ष आणखी तीव्र करू. आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत, पण आमच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढू."
संतोष भोसले: "गेल्या दोन पिढ्यांपासून आम्ही कंपनीची सेवा करत आहोत. आमच्या वडिलांनी या कंपनीच्या उभारणीसाठी मेहनत घेतली. गेली ५५ वर्षे सेवा दिल्यानंतर आम्हाला बक्षीस मिळायला हवे, की शिक्षा?"
सुनिल परसे म्हणाले जसे कंपनी व्यवस्थापनाने युनियन स्वीकारली तसेच आम्हालाही ३४ महिन्यांचे थकीत वेतन देऊन पुन्हा चिंचवड येथेच पुन्हा पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे.