मुंबई : राज्यस्तरीय कामगार केसरी कुस्ती स्पर्धेत पै.चेतन राक्षेने बाजी मारली असून कुमार केसरी कुस्ती स्पर्धेत पै.विवेक पाटील अजिंक्य ठरला आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे मंगळवारी कामगार केसरी किताबासाठी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे पैलवान चेतन राक्षे आणि विश्वचरण सोलनकर यांच्यात अंतिम लढत झाली. यावेळी दोन्ही पैलवानांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत प्रेक्षकांची मने जिंकली. पहिल्या तीन मिनिटांत राक्षेने ४ गुणांची तर सोलनकरने ३ गुणांची कमाई केली. नंतरच्या डावात सोलनकरने चांगला खेळ करत ७ गुणांपर्यंत मजल मारत राक्षेपेक्षा ३ गुणांनी आघाडी घेतली. मात्र शेवटच्या मिनिटात राक्षेने भालदाज डाव टाकत ४ गुणांची कमाई केली आणि ८-७ अशा एका गुणाच्या फरकाने कामगार केसरी किताबावर आपले नाव कोरले.
दुसरीकडे कुमार केसरी किताबासाठी कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा पैलवान विवेक पाटील आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पैलवान शेखर पाटील यांच्यात अंतिम लढत बघायला मिळाली. कुंभी कासारीच्या विवेक पाटीलने डाव-प्रतिडाव व ताकदीच्या जोरावर शेखर पाटीलला ४-० गुणांसह सहज पराभूत करत कुमार केसरीचा किताब पटकावला.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे दि.९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान ३७ व्या राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून १४५ पैलवान स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष भालचंद्रसिंग रावराणे, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, मुंबई शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, मुंबई शहर तालिम संघाचे सरचिटणीस प्रकाश तानवडे, ए.एस.कुमार, रविंद्र सावंत, जितेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
५७ किलो - सोहम कुंभार (दूधगंगा वेदगंगा सह.साखर कारखाना) वि.वि. धनराज जामनिक (दूधगंगा वेदगंगा सह.साखर कारखाना),
६१ किलो - अजय कापडे (त्रिमूर्ती ग्रुप) वि.वि. अतुल चेचर (कुंभी कासारी सह.साखर कारखाना),
६५ किलो - करणसिंग देसाई (कुंभी कासारी सह.साखर कारखाना) वि.वि. दीपक पाटील (कुंभी कासारी सह.साखर कारखाना),
७० किलो - अनुप पाटील (कुंभी कासारी सह.साखर कारखाना) वि.वि. आकाश कवडे (किसनवीर सह.साखर कारखाना),
७४ किलो - निलेश हिरगुडे (दुधगंगा वेदगंगा सह.साखर कारखाना) वि.वि. अभिनंदन बोडके (जयसिंग सह.साखर कारखाना)
कामगार केसरी किताबासाठी चेतन राक्षेला रु.७५ हजार, चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले, तर उपविजेता विश्वचरण सोलनकरला रु.५० हजार व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. कुमार केसरी किताबासाठी विवेक पाटीलला रु.५१ हजार, चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले तर उपविजेता शेखर पाटीलला रु.३५ हजार आणि प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
कामगार केसरी कुस्ती स्पर्धेचे तृतीय पारितोषिक रु.३५ हजार गरगिरा-फलटण येथील पै.आकार माने आणि उत्तेजनार्थ पारितोषिक रु.२० हजार वारणा सह.साखर कारखान्याचा पै.प्रथमेश गुरव याला प्रदान करण्यात आले. कुमार केसरी स्पर्धेचे तृतीय पारितोषिक रु.२० हजार श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पै.श्रीकांत सावंत यास तर उत्तेजनार्थ पारितोषिक रु.१० हजार सद्गुरु सहकारी साखर कारखान्याचा पै.देवदास जाधव यास देण्यात आले. तसेच विविध ५ वजनी गटात विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार ते १० हजार देवून गौरविण्यात आले.