कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रमी म्हणजे पाच कोटींहून अधिक दावे निकाली

आर्थिक वर्ष 2023 24 मधील 89.52 लाख दावे या आकड्याशी तुलना करता आर्थिक वर्षाच्या 2024- 25 मध्ये ऑटो क्लेम सेटलमेंटच्या माध्यमातून जवळपास दुप्पट म्हणजे 1.87 कोटी दावे निकाली काढण्यात आले

97.18% सदस्यांच्या प्रोफाइलमधील सुधारणांना त्या सदस्यांची मान्यता मिळवण्यात आली

आता फक्त आठ टक्के हस्तांतरणाच्या दाव्यांना सदस्य आणि नियोक्त्यांकडून प्रमाणन आवश्यक आहे

नवी दिल्‍ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने इतिहासात पहिल्यांदाच पाच कोटींहून दावे निकालात काढून ऐतिहासिक टप्पा गाठला आहे असे आज केंद्रीय कामगार आणि रोजगार तसेच युवक कल्याण आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी (6 फेब्रुवारी 2025) जाहीर केले. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2,05,932.49 कोटी रुपयांच्या एकूण 5.08 कोटी एवढ्या दाव्यांवर प्रक्रिया केली. यापैकी 4.45 कोटी दावे जे 1,82,838.28 कोटी रुपयांचे होते ते आधीच्या आर्थिक वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष 2023 24 मध्येच निकाली काढण्यात आले होते, म्हणून ते दावे विचारात घेतले गेले नाहीत. 

     दावे निकाली काढण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे तसेच सदस्यांच्या तक्रारींमध्ये घट व्हावी या उद्देशांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने दावे निकाली काढण्याच्या प्रक्रियेत केलेल्या परिवर्तनशील सुधारणांच्या श्रेणींमुळे हे लक्षणीय ध्येय साध्य झाल्याचे केंद्रीय मंत्री मांडवीय यांनी अधोरेखित केले. आपोआप निकाली निघणाऱ्या म्हणजेच ऑटो सेटल होणाऱ्या दाव्यांबाबत त्यांच्या श्रेणी तसेच उच्चतम मर्यादा रकमेत केलेली वाढ, सदस्यांच्या प्रोफाइल मधील बदलांची प्रक्रियेचे सुलभीकरण,भविष्य निर्वाह निधी हस्तांतरण सुव्यवस्थित करणे आणि केवायसी म्हणजे ग्राहक ओळख पडताळणी अनुपालन प्रमाण सुधारणे अशा अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आम्ही अमलात आणल्या. या सुधारणांमुळे भविष्य निर्वाह निधी संघटनेची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढल्याचे मांडवीय यांनी सांगितले.

     ऑटो क्लेम सेटलमेंट म्हणजेच दावे आपोआप निकाली काढण्याच्या व्यवस्थेने जलद दावे प्रक्रियेतील महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रक्रियेमुळे त्यावेळी सादर झाल्यापासून तीन दिवसांच्या आत निकाली काढण्याची हमी देता आली. या सुधारणांचा परिणाम म्हणजे साहजिकच ऑटो क्लेम किंवा आपोआप दावे निकाली काढण्याचे प्रमाण दुपटीने वाढले. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये 89.52 लाख दावे निकाली काढण्यात आले त्या तुलनेत यावर्षी, 2024- 25 या आर्थिक वर्षात 1.87 कोटी दावे निकाली निघाले, असे मांडवीय यांनी नमूद केले.

     त्याचप्रमाणे, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) हस्तांतरण दावे दाखल करण्याच्या प्रक्रियेतील सुधारणांमुळे या कार्याला सुव्यवस्थित  गती लाभली  आहे. एक सरलीकृत हस्तांतरण दावा पध्दतीने अर्ज सादर केल्यामुळे ,आता फक्त 8%दाव्यांसाठी हस्तांतरण सदस्य आणि नियोक्ता यांनी प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता उरली  आहे.विशेष म्हणजे, 48% दावे नियोक्त्याच्या हस्तक्षेपाशिवाय सदस्यांद्वारे थेट पध्दतीने दाखल केले जातात, तर 44% हस्तांतरण विनंतीपत्रे आपोआप  तयार होत आहेत.

     डॉ. मांडविया यांनी पुढे सदस्यांच्या ओळख पटविण्यासाठी आवश्यक सुधारणांच्या प्रभावावर जोर दिला."सरलीकृत कार्यपद्धती सुरू झाल्यापासून, सदस्यांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांमुळे  अंदाजे 97.18% सदस्यांनी आपले अर्ज स्वत: मंजूर केले आहेत, फक्त 1% सदस्यांसाठी नियोक्त्याची मंजुरी आवश्यक उरली आहे, आणि कार्यालयीन हस्तक्षेप कमी झाला असून तो  फक्त 0.4% पर्यंत उरला आहे.तसेच, नियोक्त्यांनी नाकारण्याची प्रकरणे 1.11% पर्यंत आणि विभागीय कार्यालयीन प्रकरणे 0.21% खाली आली  आहेत. अशाप्रकारे   सुव्यवस्थित प्रक्रिया आणि दाव्यांच्या तोडग्यांमधील प्रक्रियात्मक अडथळे कमी झाले आहेत ", असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

कर्मचारी भविष्य निर्वाह कार्यालय 

(EPFO) सदस्यांसाठी सुलभ प्रवेश वाढविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देताना डॉ. मांडविया यांनी अधोरेखित केले, की संस्था अखंड आणि कार्यक्षम सेवेचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रक्रिया सुलभीकरणाचा लाभ घेत राहील.  "या सुधारणांमुळे केवळ दावा निकाली काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला नाही इतकेच नव्हे तर सदस्यांच्या तक्रारी कमी करण्यात, EPFO वरील विश्वास आणखी वाढण्यासही योगदान मिळाले आहे,"असे ते पुढे म्हणाले.