कामगार मंत्री फुंडकर म्हणतात, चौकशी होणार...

आयुध निर्मानीतील घटनेनंतर आज राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी प्रशिक्षणार्थी उमेदवार संवेदनशील ठिकाणी गेला कसा याची चौकशी होऊन कारवाई होणार तर पालकमंत्री संजय सावकारे यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना मोठी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.

       दोन्ही मंत्री महोदयांनी घटनास्थळाला भेट देत, रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या. अति संवेदनशील अशा कामाच्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी असलेल्या उमेदवाराला पाठविणे योग्य नव्हते. तो तिथे गेला कसा, याची चौकशी करून पुढे येणाऱ्या वास्तवाच्या आधारे दोषींवर कारवाई करण्यात येईल. जे गंभीर जखमी आहेत, त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचे बयान नोंदवून पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. सोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय समिती गठीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

     तर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी मृत स्थायी स्वरूपाच्या कर्मचाऱ्यांना जवळपास एक कोटी रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले. केंद्र सरकारतर्फे 25 लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख, कामगार नुकसान भरपाई म्हणून 15 लाख, आणखी एका शीर्षकाखाली 40 लाख, सहा पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असेल तर पाच लाखाची वेगळी मदत अशी एकूण एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच पंधरा दिवसात नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगताना हाच निकष प्रशिक्षणार्थी मृतांच्या बाबतीता लागू करण्यात यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचेही पालकमंत्री सावकारे यांनी सांगितले.