भंडारा ऑर्डंनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट! ५ कामगार ठार

भंडारा : भंडाऱ्या जवळील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कारखान्यात (दि.२४ जानेवारी) सकाळी ११ वाजता भीषण स्फोट झाला आहे. यात ५ कामगार ठार झाले आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.या घटनेनंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. नेमका हा स्फोट कसा झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही असे वृत्त हिंदुस्थान टाइम्स मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.

      प्राथमिक माहितीनुसार आयुध निर्माण कंपनीतील सी सेक्सनमध्ये हा स्फोट झाला आहे. यावेळी काही कामगार या ठिकाणी काम करत होते. हा स्फोटक तयार करणारा कारखाना हा भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथे आहे. आज सकाळी ११ वाजता मोठा स्फोट कंपनीत झाला. या स्फोटात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कंपनीत दारू गोळा तयार केला जात होता. दरम्यान फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

बचाव कार्य सरू

     दरम्यान, या स्फोटाची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आज सकाळी भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोटाची दुर्घटना घडली आहे. बचाव पथके व वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. व बचावकार्य सुरू करण्यात आले असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.

संपूर्ण इमारत नष्ट

     ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सध्या या कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत स्फोट झाला तेव्हा कंपनीत १४ कामगार काम करत होते, अशी माहिती आहे. हा स्फोट कारखान्याच्या आर. के. सेक्शनमध्ये झाला. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले असून काही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली घटनेची माहिती

     भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. या स्फोटात कंपनीचे छत कोसळून १३ ते १४ कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील ५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत. आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे त्यांनी ट्विट केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.