भंडारा :भंडाऱ्यामध्ये सनफ्लॅग कारखान्यात पुन्हा अपघात घडला आहे. या घटनेत कंपनीत काम करणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना लागलीच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे असे वृत्त साम TV वृत्तसंस्थेने दिले आहे.
दोन दिवसा अगोदरच भंडाऱ्यातील जवाहर नगर फॅक्टरी येथे झालेल्या ब्लास्ट मध्ये एका ऑपरेशन करणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे क्लेरीन ड्रग कंपनी तुमसर येथेही झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाला. यानंतर आता दोन दिवसातच भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग आयर्न स्टील कारखान्यात हा अपघात घडला आहे. या कारखान्यात नेहमीच असे अपघात घडत असतात आणि कित्येकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
क्रेनचा हुक तुटून अपघात
भंडाराच्या सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कारखान्यात अपघात घडला आहे. याठिकाणी ब्राईट बार सेक्शन मधील मोठ्या क्रेनचा हुक तुटून हा अपघात घडला आहे. यात दोन कामगारांवर हे हुक पडून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या लक्ष हॉस्पिटल भंडारा येथे उपचारासाठी भरती करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे. जखमीच्या नातेवाईकांनी जखमीची पूर्ण जिम्मेदारी कारखाना प्रशासनाने घ्यावी अन्यथा कंपनीवर धडक मोर्चा नेणार असल्याचे सांगितले.
दोघेही प्रशिक्षणार्थी कामगार
सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कारखान्यात झालेल्या अपघातात दोन कामगार जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये जखमी असलेले दोन्हीही अप्रशिक्षित असून त्यापैकी एक राज्य सरकारच्या योजनेतून सहा महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून कंपनीत कामाला होते. दरम्यान या कंपनीत नेहमीच असे अपघात होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कंपनीच्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.