कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यास सॅमसंग कंपनी तयार, मग अडलं कुठे ?

ऐनसणासुदीत सॅमसंगच्या दक्षिण भारतातील युनिटसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. गेल्या महिनाभरापासून येथील सॅमसंगच्या प्लांटमध्ये कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. साम, दाम आणि दंडाचा वापर करुनही कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. कर्मचाऱ्यांसमोर कंपनीने अक्षरशः हात टेकायचे बाकी आहेत. आता या प्रकरणात तामिळनाडू सरकारनेही एन्ट्री घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हा संप संपवण्याची जबाबदारी आपल्या ३ मंत्र्यांवर सोपवली आहे. दरम्यान, सॅमसंगने कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, कर्मचारी संघटना सीटू या करारासाठी अडून बसल्याचा कंपनीचा आरोप आहे असे वृत्त लोकमत वृत्तसंस्थेने दिले आहे.

सॅमसंगच्या अधिकाऱ्यांनी घेतली तामिळनाडूच्या उद्योगमंत्र्यांची भेट 

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, कोरियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी तामिळनाडूचे उद्योगमंत्री टीआरबी राजा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्लांटमध्ये सुरू असलेला संप लवकरात लवकर संपवण्याची मागणी केली. सॅमसंगच्या या प्लांटमध्ये सुमारे १ हजार ७५० कर्मचारी काम करतात. त्यापैकी सुमारे १ हजार १०० जण ९ सप्टेंबरपासून संपावर आहेत. पगार वाढवावा, अशी त्यांची मागणी आहे. कामाचे तास सुधारले पाहिजेत आणि भारतीय ट्रेड युनियन्सला मान्यता द्यावी या प्रमुख मागण्या आहेत.

संप मिटण्याची आशा

टीआरबी राजा, एमएसएमई मंत्री टीएम अंबरसन आणि कामगार मंत्री सीव्ही गणेशन यांच्यावर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सॅमसंग कर्मचाऱ्यांचा संप संपवण्याची जबाबदारी आम्ही सॅमसंगच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल. सॅमसंगचे व्यवस्थापन आणि संप करणारे कर्मचारी लवकरच एक करार करतील. याचा सर्वांना फायदा होईल, अशी माहिती टीआरबी राजा यांनी दिली. 

संपामुळे सणासुदीच्या काळात सॅमसंगला मोठा झटका

संपादरम्यान मोर्चा काढणाऱ्या सुमारे ९०० संपकरी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. सॅमसंगने संप थांबवण्यासाठी कोर्टातही धाव घेतली आहे. याशिवाय या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची नोटीसही देण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना कंपनीने चॉकलेट पाठवल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले. या संपामुळे सणासुदीच्या काळात सॅमसंगला मोठा फटका बसला आहे.