ठाणे : ठाण्याच्या कोलशेत-आझादनगरमधील इंडोफिल कंपनीतील २७ कंत्राटी कामगारांची हक्काची देणी कंपनीने अडविली असल्याकडे भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. तसेच या कामगारांना हक्काची देणी मिळवून देण्यासाठी आग्रह धरला. गेल्या चार वर्षांपासून इंडोफिल इंडस्ट्रीयल कंपनी बंद पडली आहे. या कंपनीतील कायम कामगार, कंत्राटदारामार्फत कार्यरत कॅंटिन व माथाडी कामगारांची हक्काची देणी व नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही.
या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करून कंपनीचे प्रशासन दाद देत नसल्यामुळे कामगार हवालदिल झाले आहेत. या प्रकरणी कामगार उपायुक्तांच्या कार्यालयातही अनेक बैठका झाल्या होत्या. मात्र, त्यात तोडगा निघाला नव्हता. या संदर्भात भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे व जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस कृष्णा म्हात्रे यांनी आ. निरंजन डावखरे यांची भेट घेऊन या प्रश्नावर आवाज उठविण्याची मागणी केली होती.
विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे आ. डावखरे यांनी कंपनीतील २७ कंत्राटी कामगारांचा प्रश्न मांडून या कर्मचाऱ्यांना हक्काची देणी देण्याची मागणी केली. या कंपनीत हे कामगार किमान ५ ते २० वर्षांपर्यंत कार्यरत होते. त्यातील अनेक जणांची वयोमर्यादा उलटल्यामुळे त्यांना नवी नोकरी मिळू शकत नाही. तर कंपनीतून हक्काचे किमान दीड लाख रुपयेही न मिळाल्यामुळे कामगार हवालदिल झाले आहेत.