देशातील अन्नप्रक्रिया आणि शीतपेय क्षेत्रातील एका आघाडीच्या पेप्सिको इंडिया कंपनीने महिला सक्षमीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने 'क्रांती नारी - नारीसाठी क्रांती' उपक्रमाची सुरुवात केली आहे. कंपनीच्या उपक्रमाद्वारे देशातील जवळपास 1 दशलक्ष महिलांना सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. कंपनीच्या या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या करिअरबाबत महत्वाचे निर्णय घेण्यास मदत होणार आहे. याशिवाय महिलांना रोजगारसंधी निर्माण होण्यास देखील मदत होणार आहे.
काय आहे हा उपक्रम?
कंपनीचा हा उपक्रम देशातील महिलांना करिअरसह रोजगार उपलब्ध होण्यासाठी महत्वाचा उपक्रम आहे. याद्वारे महिलांना अन्नप्रक्रिया उद्योग, कृषी उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. याशिवाय कंपनीकडून महिलांना या क्षेत्रामध्ये सामावून घेणे हा देखील यामागील मुख्य उद्दिष्ट असणार आहे. इतकेच नाही तर देशभरातील कंपन्यांमध्ये स्त्री-पुरूष असमानतेमधील अंतर दूर होण्यास देखील यामुळे मदत होणार आहे.
स्त्री-पुरुष समानतेला बळकटी मिळणार
याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जागृत कोटेचा यांनी म्हटले आहे की, कंपनीने आपल्या 'क्रांती नारी - नारीसाठी क्रांती' उपक्रम तीन वर्षांसाठी राबवण्यासाठी तीन वर्षांचे धोरण निश्चित केले असून, या धोरणाद्वारे, देशभरातील अपारंपरिक क्षेत्रामध्ये महिलांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ज्याद्वारे शाश्वत विकास आणि सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये लैंगिक समानता येण्यास बळकटी मिळणार आहे. याशिवाय कंपनीने देशातील महिलांसाठी केलेली गुंतवणूक ही देशाच्या सर्वसमावेशक भविष्यासाठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महिलांच्या जीवनात बदल घडवून आणणे
'क्रांती नारी - नारीसाठी क्रांती' उपक्रम कंपनीच्या वैविध्य, समानता आणि समावेशकता या तत्वांसाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कंपनीने देशभरात 1 दशलक्ष महिलांना त्यांच्या सर्वांगीण विकासाची सोय करण्याचे निश्चित केले आहे. ज्यामुळे देशातील महिलांच्या सक्षमीकरणास मोठी मदत होणार आहे. केवळ महिला सक्षमीकरण हे कंपनीचे उद्दिष्ट नसून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. असे कंपनीच्या सीएचआरओ पवित्रा सिंग यांनी म्हटले आहे.