कोल्हापूर : अनुसूचित जातीतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी वारसा हक्क पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्याचे स्वागत करीत सफाई कामगारांनी महापालिकेसमोर येऊन जल्लोष केला. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देऊन निकालाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यामुळे सेवानिवृत्त अथवा सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर असलेल्या सुमारे ३५ हून अधिक सफाई कामगारांच्या वारसांच्या महापालिकेतील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ५५० सफाई कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी सर्वच प्रवर्गातील सफाई कामगारांसाठी वारसा हक्क सुरू होता, पण म्हेतर समाज वगळता अन्य कामगारांसाठी वारसा हक्कावर निर्बंध घातले होते. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रश्न औरंगाबाद खंडपीठाकडे प्रलंबित होता. त्यावर निर्णय झाला. खंडपीठाने पहिल्या टप्प्यात अनुसूचित जातीमधील सफाई कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे वारसा हक्क सुरू करण्याचा निकाल दिला. याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांने उपायुक्त पाटील यांच्याकडे केली.
यावेळी गौतम कांबळे, शिवाजी कांबळे, किरण कांबळे, धनराज पाल, सुखदेव सोनिकर, दादू हेगडे, मुसा शेख, सलीम शेख, विजय चव्हाण, नरेश नगरकर, झाकीर जमादार, अमोल कविशील आदी उपस्थीत होते.