वेतन थकवल्याने कामगारांचा ठिय्या

पिंपरी : सफाई कामाचे कंत्राट संपल्याची पूर्वसूचना न देता काम थांबविल्याने ५० सफाई कामगाराचे वेतन थकले आहे. त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी सफाई महिला कामगारांनी पालिकेसमोर ठिय्या मांडला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य विभागाच्या चुकीच्या कारभाराचा फटका सफाई कामगाराला बसला असून अतिरिक्त कामाचे पैसे कोण देणार ? अशी चिंता सफाई कामगारांनी व्यक्त केली आहे असे वृत्त प्रभात वृत्तसंस्थेने दिले आहे.

    महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सफाई काम काढण्यात आले. हेडगेवार भवन, सेक्टर १५, मदनलाल धिंग्रा येथील साफसफाई काम महिला कामगारांच्या माध्यमातून केले जाते. परंतु, १७ मार्च २०२४ रोजी या कामाची मुदत संपल्याची कोणतीही पूर्वसूचना सफाई कामगारांना दिली गेली नाही. त्यांना दर महिन्याच्या १ तारखेपर्यंतचे वेतन दिले जाते.

    कामाची मुदत संपल्याची माहिती नसल्याने सफाई कामगार १ ते १७ मार्चपर्यंत काम करीत राहिले. १८ मार्च २०२४ रोजी नवीन संस्थेला हे काम देण्यात आले. नवीन संस्थेने १८ मार्चपासून कामाची सुरुवात केली. त्यामुळे १ ते १७ मार्च दरम्यानचे वेतन सफाई कामगाराला मिळालेच नाही. त्यामुळे पोटासाठी साफसफाई करणाऱ्या महिला कामगारांना आर्थिक झळ सोसावी लागली आहे.

    महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी याबाबत सफाई कामगारांना पूर्वकल्पना दिली नाही. त्यामुळे सफाई कामगार इमाने इतबारे दररोज ठरल्याप्रमाणे काम करीत राहिले. नवीन संस्थेने त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कामगारांना याची माहिती झाली. त्यामुळे १७ दिवसांचा पगार देण्यास जुन्या संस्थेने नकार दिला आहे. त्यामुळे आम्हाला १७ दिवसांचे वेतन कोण देणार, अशी चिंता कामगार महिलांनी व्यक्त केली आहे.

    वेतनाची मागणी करण्यासाठी बुधवारी (दि. २४) ५० सफाई कामगार महिला महापालिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी यशवंत डांगे यांच्या भेटीला आल्या होत्या. परंतु, सुरक्षारक्षकांनी त्यांना आत प्रवेश न दिल्याने त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. आरोग्य विभागाने हात वर केले तर आमचे हक्काचे वेतन कोण देणार ? असा प्रश्‍न कामगार महिलांनी उपस्थित केला होता.