वाडा : तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायत परिसरातील सुधीर स्वीच गिअर प्रा. लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता गाशा गुंडाळला आहे. संचालक मंडळाने कंपनी बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार आक्रमक झाले असून कामगारांनी तहसीलदार कार्यालयासमोर ६ मार्च रोजी बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार उपआयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
खुपरी या गावामध्ये सुधीर स्वीच गिअर प्रा. लिमिटेड ही कंपनी होती. या कंपनीत अनेक कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते. काही दिवसांपूर्वीच व्यवस्थापनाने कामगारांना कोणत्याही प्रकारची लेखी पूर्वसूचना न देता १ फेब्रुवारीपासून कंपनी बंद केली आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना न्याय मिळावा, यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर ६ मार्च रोजी बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला संघटनेने पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती जिजाऊ कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश भोईर यांनी दिली.