महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील पूर्णवेळ व अर्धवेळ पगारी कर्मचा-यांना न्याय मिळवून देणार - राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले

कामगार कल्याण मंडळाचा वर्धापन ८५ वा वर्धापन दिन साजरा

मुंबई -  राज्य कामगार कल्याण मंडळाच्या अर्धवेळ पगारी कर्मचा-यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या २० ते २५ वर्ष या कामगारांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत.यामुळे नैराश्यात असलेले हे कामगार  शेतक-यांप्रमाणे आत्महत्या करताहेत. राष्ट्रीय श्रमिक आघाडी  या कर्मचाऱ्यांसाठी आवाज उचलणार असून त्यांना न्याय मिळवून देईपर्यत स्वस्थ बसणार नाही असे आश्वासन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिले. 

    प्रभादेवी येथील हुतात्मा नानू गेनू गिरणी कामगार क्रीडा भवन येथे आयोजित ८५ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कर्मचा-यांच्या भव्य मेळाव्यात (दि. २ डिसेंबर) यशवंत भोसले बोलत होते.या कार्यक्रमाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे , राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सल्लागार मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

    राज्यातील कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासोबत त्यांच्या अधिकार आणि हक्काची सुरक्षा करणारे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला ८५ वर्ष पुर्ण झाले आहे. या निमीत्ताने राज्यभरातील कामगार या सोहळ्याला उपस्थित होते. 

    या मेळाव्यात मेळाव्यात बोलतांना यशवंत भोसले म्हणाले की, आजच्या या मेळाव्याला राज्यभरातील कामगारांनी मोठ्या अपेक्षेने हजेरी लावली.यातील अनेक कामगार गेल्या दोन ते तिन दशकापासून अर्धवेळ पगारात काम करत आहेत. त्यांचा पगार ५ हजाराच्या वर गेलेला नाही. मात्र ते काम पुर्ण आठ तास करत आहे. या  कामगारांना कुठलेही पेन्शन,ग्रँज्युएटी लागू नाही. ही मिळवून देण्यासाठी श्रमिक आघाडी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या  कामगारांना समान काम समान वेतन मिळायला हवे यासाठी आज ठरावही मांडण्यात आला.

    राज्य सरकारने २००५ मध्ये भरती प्रक्रिया राबववली होती. यावर अनियमित असल्याचा ठपका ठेवत कामगारांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले. गेल्या १५ वर्षापासून कामगारांवर अन्याय होत आहे. हे प्रकरण निकाली काढून या कामगारांना न्याय देण्याची मागणी भोसले यांनी केली.हल्ली अनेक कामगारांवर केवळ कुणीतरी आरटीआय टाकला म्हणून कारवाई केली जाते.अन्यायकारक कारवाई थांबवण्याची मागणी त्यांनी केली. 

    यावेळी बोलताना राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सल्लागार मुकुंद कुलकर्णी  यांनी  सांगितले की, कामगारांच्या प्रश्नासाठी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या शी बोलून कामरागांना न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

निधी वाढवणार 

    राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना इळवे यांनी सांगितले की,कामगारांच्या कल्याणासाठी मंडळ कटीबद्ध आहे. या साठी शासन सहभाग वाढण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील लाखो कामगारांशी निगडीत आहे. कामगारांचे अनेक प्रश्न असून त्या प्रश्नांची जाण शासनाला आहे. ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहे.आर्थिक निधीची कमतरता भासू नये यासाठी दुस-या बाजूने उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. कामगारांसाठी निधी वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे इळवे म्हणाले.

ठराव पारीत 

    मेळाव्यात राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडून ठराव मांडून ते संमत करण्यात आले. यात अर्धवेळ कर्मचा-यांना कायम करा,मंडळातील रखडलेली भरती आणि बढती प्रक्रिया पुन्हा सुरू करा,कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगातील तफावत दणे, या ठरावांचा समावेश आहे. यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे संघटनेकडून लांगण्यात आले.