इंदापूर : वालचंदनगर येथील कंपनीतील कामगार गेल्या १० दिवसापासुन संपावरती असून संपावरती तोडगा निघाला नाही. कंपनी कामगारांच्या मागण्या मान्य करीत नसल्यामुळे कामगार संघटना आक्रमक झाली असून कामगारांनी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा कंपनीला दिला आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
वालचंदनगर मधील वालचंदनगर कंपनीमध्ये आयएमडी कामगार समन्वय संघटना कार्यरत आहे. संघटनेचे सुमारे ६०० कामगार सदस्य असून कामगारांनी बुधवार (ता. २२) पासुन शांततेमध्ये संपाला सुरवात केली आहे. आज संपाचा ११ दिवस होता.कामगार संघटनेने आज शनिवारी कामगारांशी एकत्र चर्चा केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कपिल गायकवाड व सेक्रेटरी शहाजी दबडे यांनी सांगितले की,गेल्या १० दिवसापासून कामगारांनी शांततेमध्ये संप सुरु ठेवला आहे.
कामगारांच्या भाकरची प्रश्न असून आपण कामगारांच्या हक्कासाठी लढा देणार आहोत. मागण्या मान्य झाल्याशिवाय कामगार पाठीमागे हटणार नाहीत.आत्तापर्यंत आपण शांततेमध्ये संप केला असून यापुढे संघटना आक्रमक होणार आहे. सर्वांशी चर्चा करुन संपाची व आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. कामगार व त्यांच्या कुंटूबाने संपाला घाबरुन जावू नये. तसेच येणाऱ्या काळामध्ये अफवावरती विश्वास ठेवू नये असे आवाहन कामगार संघटनेने केले.
कामगारांची एकजूट
दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटना व प्रत्येक कामगाराला वैयक्तिक नोटीस पाठवली आहे. यामध्ये संप असमर्थनीय व बेकायदेशीर असल्याचा उल्लेख आहे. संपाचा परीणाम कंपनीच्या उत्पादनावरती झाला आहे. कंपनीकडे असलेल्या ऑर्डर पूर्ण करुन देणे कठीण झाले असून उत्पादनप्रक्रिया सुरु करण्याकरीता तसेच ग्राहकांना मालाचा पुरवठा करण्यासाठी कंपनी पर्यायी व्यवस्था करणे अनिवार्य आहे.
कंपनीची भविष्यात पर्यायी व्यवस्था सुरु झाल्यानंतर सध्या संपावरती असलेल्या कामगारांना काम देणे कंपनीच्या आवाक्याबाहेर जाणार असल्याने ५ डिसेंबरपर्यंत कामावरती हजर राहावे अन्यथा निर्माण होणाऱ्या परस्थितीला सर्व कामगार जबाबदार असल्याचे कळविले आहे. सदरची नोटीस कामगार संघटनेने कामगारांना वाचून दाखवली. मात्र कामगारांनी एकजुटीने मागण्या मान्य होईपर्यंत कामावरती न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, सदरचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने यावरती बोलता येणार नसल्याचे कळविले आहे.
लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज
स्वातंत्रय पूर्व काळापासुन वालचंदनगरमध्ये वालचंदनगर कंपनी सुरु आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांचे जनजीवन कंपनीवरती अवलंबून आहे. संपावरती तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे परीसरातील नागरिक व्यक्त करीत आहे.
