कामगारांच्या मागण्यांबाबत 8 दिवसात निर्णय घ्या

चंद्रपूर : फेरो अलॉय प्लांटच्या आंदोलनकर्त्या 6 कामगारांवर कंपनी व्यवस्थापनाने लावलेले मनाई आदेश रद्द करून, त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावे व कामगारांच्या मागण्याबाबत 8 दिवसात निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी फेरो अलॉय प्लांट व्यवस्थापनाला दिले असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.

    कंपनीने आश्वासन दिल्यानंतर अगदी टॉवरवर चढून कर्मचार्‍यांनी केलेले आंदोलन मागे घेण्यात आले होते. फेरो अलॉय प्लांट येथील कामगारांच्या आंदोलनाबाबत कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांची सोमवार, 4 डिसेंबर रोजी सकाळी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी हे निर्देश दिले.

    चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटच्या Ferro Alloy Plant कार्मिक व प्रशासनाने विभागाचे प्रमुख मुख्य महाव्यवस्थापक बिस्वनाथन बी. यांनी कुठल्याही प्रकारे लेखी न देता आंदोलनकर्त्या 6 कामगारांना उद्योगात येण्यास मज्जाव केला होता. हा विषय जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत प्रामुख्याने समोर आला. यावर जिल्हाधिकार्‍यांनी ताबडतोब या 6 कामगारांवर कामावर घ्या, असे निर्देश व्यवस्थापनाला दिले. त्यानंतर समान काम समान वेतन, या विषयावर चर्चा झाली. या विषयावर मुख्य महाव्यवस्थापक बिश्वनाथन बी. यांनी शुक्रवारपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा कामगारांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन केल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ही उद्योग प्रबंधनाची राहिल, असे निर्देश दिले. कामगारांना 3 वेळा न्यायिक अधिकार प्राप्त झालेला असून, वारंवार उद्योग प्रबंधन न्यायालयात जातात व कामगारांना त्यांच्या हक्कपासून वंचित ठेवतात, हे ठीक नसून यावर आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले. या घटनेमुळे फेरो अलॉय प्लांट व्यवस्थापनाची नाचक्की झाली आहे.

    या Ferro Alloy Plant बैठकीला भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावड़े, दत्तप्रसन्न महादानी, नगर सेविका चंद्रकला सोयाम, नगरसेवक सचिन भोयर, नितिन भोयर, धनराज कोवे, मुख्य महाव्यवस्थापक बिश्वनाथ बी., लेखा विभागाचे मोहरकर यांच्यासह कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुर्यकांत चांदेकर, सहसचिव माणिक सोयाम, महासचिव माणिक बटाले, कोषाध्यक्ष महादेव चिकटे आदी उपस्थित होते. कामगारांच्या मागण्यांबाबत सीएफपी प्रबंधनाने 8 दिवसात निर्णय न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.