ऊस तोडणी वाहतूक दरवाढीसाठीची तिसरी बैठकही निष्फळ, सर्व संघटना किमान ५५ टक्के दरवाढीवर ठाम

पुणे : येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ऊसतोडणी व  वाहतूक दरवाढीच्या संदर्भात त्रिपक्षीय बैठक झाली. बैठकीत संघटनेच्या वतीने डॉ.डी.एल.कराड यांनी गुजरात मध्य प्रदेश व तामिळनाडू येथील दराशी तुलना करता महाराष्ट्रातील ऊसतोडणी दर खूपच कमी असल्याने त्यामध्ये १०० टक्के वाढ करण्याची मागणी केली .  किमान ८० टक्के वाढ झाली तरच गुजरात इतका दर होणार असल्याने तेवढी वाढ करण्याची मागणी केली.तसेच ऍडव्हान्स व त्यासंदर्भातील वाहतूकदार व मुकादम यांच्या फसवणूकी बाबतीत कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी कायदेशीर व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली.

    त्यानंतर साखर संघाचे पदाधिकारी यांनी  १८टक्के वाढीचा प्रस्ताव दिला.तो कामगार संघटनेचे प्रतिनिधीनी फेटाळताना त्यामुळे तीन वर्षातील महागाई चीही भरपाई होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे साखर संघाचे पदाधिकारी यांनी आपसात चर्चा करून २४ टक्के वाढीचा नवा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यावर चर्चा करताना सर्वंच संघटनांनी तो प्रस्ताव अमान्य करून ५५ टक्के पेक्षा कमी दरवाढ स्विकारणार नाही असे सांगितले.

     त्यावर साखर संघाचे पदाधिकारी यांनी याबाबत शरद पवार साहेबांच्या बरोबर चर्चा करून पुन्हा बैठक घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे ही तिसरी बैठक ही दरवाढीच्या अंतिम निर्णयाविना समाप्त झाली.

     बैठकीला राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राष्ट्रीय फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,आम.प्रकाश आवाडे, कार्यकारी संचालक संजय खताळ व अन्य संचालक उपस्थित होते.ही बैठक राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली होती.बैठकीच्या स्थळी उपस्थित असलेले वळसे-पाटील हे बैठक सुरू होण्यापूर्वीच निघून गेले.त्यामुळे  राज्य सरकारचे प्रतिनिधी असलेल्या सहकार मंत्री यांना ऊसतोड कामगारांच्या बदल आस्था नसल्याने ते निघून गेल्याचे नमूद करून संघटना प्रतिनिधीनी नाराजी व्यक्त केली.

     बैठकीत ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनांचे डॉ.डी.एल. कराड,प्रा. डॉ.सुभाष जाधव, आमदार सुरेश धस,प्रा.आबासाहेब चौगले, दत्ता डाके, जीवन राठोड, सुखदेव सानप, दत्तात्रय भांगे,प्रा.सुशिलाताई मोराळे, प्रदिप भांगे,थोरे पाटील, विष्णूपंत जायभावे, गोरक्षनाथ रसाळ, नामदेव राठोड, संजय तिडके आदी सह प्रमुख कार्यकर्ते हजर होते.