वालचंदनगर : येथील वालचंदनगर कंपनीतील कामगारांनी सुरु केलेला संप १५ व्या दिवशीही सुरु होता. कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला असल्याची माहिती आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे यांनी दिली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
वालचंदनगर कंपनीतील आयएमडी कामगार समन्वय संघाच्या सुमारे ६०० कामगारांनी २२ नोव्हेंबर पासुन संपास सुरुवात केली आहे. बुधवार (ता. ६) रोजी संपाचा १५ दिवस होता. वालचंदनगर कंपनीच्या व्यवस्थापनाने मागण्या मान्य न केल्यामुळे कामगार संपावरती ठाम आहेत.
औद्योगिक न्यायालयामध्ये कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांनी याचिका दाखल केल्या असून यावरती सुनावणी सुरु आहे. यासंदर्भात आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे यांनी सांगितले की, कंपनीकडे कामगारांची सुमारे ७ कोटी ८० लाख रुपयांची थकीत देणी आहेत.
यातील संप मागे घेतल्यानंतर ४० टक्के रक्कम आठ दिवसामध्ये व उवरित ६० टक्के रक्कम दोन टप्यामध्ये पुढील जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच वेतनवाढीच्या करार मार्च २०२४ नंतर चर्चा करुन सोडविण्याचा प्रस्ताव दिला आहे.
मात्र आम्ही वेतनवाढीचा करार तातडीने करण्याची मागणी केली असून आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत कामावरती जाणार नसून सर्व कामगार संपावरती ठाम असल्याचे सांगितले. कंपनीचे सुमारे ६०० कामगार दररोज युनियन कार्यालयाच्या समोर येत असून एकत्र चर्चा करीत आहेत. गुरुवार (ता. ७) रोजी औद्योगिक न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे.
व्यवस्थापनाचे एकाच दिवशी दोन पगार...
यावेळी आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे यांनी सांगितले की, कामगारांचे तीन पगारसह व इतर देणी थकीत आहेत. कंपनीने गेल्या चार दिवसामध्ये व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे एकाचवेळी दोन महिन्याचा पगार जमा कामगारांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप कामगार संघटना करीत आहे.
बुधवार (ता. ६) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व कामगारांच्या वतीने युनियने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच आय.एम.डी. कामगार समन्वय संघाच्या प्रतिनिधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये जावून पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.