कारखान्यात भीषण स्फोट, 9 कामगार ठार, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती

नागपूर : रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्यात एक इमारत उध्वस्त झाली आहे. घटनास्थळी आमदार अनिल देशमुख यांनीही भेट दिली. यावेळी ते म्हणाले, अत्यंत दुर्दैवी अपघात झाला आहे. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

सरकारकडून मदत जाहीर 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे आश्वासन त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिले आहे. या वर्षी ऑगस्टमध्येही या कंपनीला आग लागली होती. त्यावेळी कचऱ्यात स्फोट झाला त्यात दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. या घटनेला पाच महिनेही उलटले नव्हते इतक्यात रविवारी मोठा स्फोट झाला आहे.

संरक्षण दलासाठी ड्रोन, स्फोटकांची निर्मिती 

सोलर ग्रुपद्वारे चालवले जाणारी इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड ही कंपनी संरक्षण क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र उत्पादकांपैकी एक आहे. सध्या येथे भारतीय लष्कर आणि नौदलासाठी विविध शस्त्रे तयार केली जातात. तसेच या कंपनीच्या माध्यमातून भारताबाहेर तीसहून अधिक देशांमध्ये शस्त्रे निर्यात केली जातात.