कामगार मंत्री सुरेश खाडे यांची वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या प्रश्नी २ जानेवारीला बैठक : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : मे. वालचंदनगर इंडस्ट्रीजचे कामगार २२ नोव्हेंबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत मुंबईत मंत्रालयात मंगळवारी (ता.२) सर्व संबंधितांच्या बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली असे वृत्त पुणे प्राईम न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.

    हर्षवर्धन पाटील यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याशी १० डिसेंबर रोजी दूरध्वनीवरुन चर्चा करून वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या संपासंदर्भात सर्व संबंधितांची तातडीने बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी विनंती केली होती. त्यावर चालू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन संपताच तत्काळ सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी हर्षवर्धन पाटील यांना सांगितले.

    दरम्यान, पाटील यांनी केलेल्या विनंतीनुसार कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांच्या प्रश्नांवर मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण हर्षवर्धन पाटील यांना शासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

    वालचंदनगर कंपनीतील कामगार थकीत पगार व १७-१८ महिन्यांपासून मुदत संपलेला वेतनवाढीचा करार करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत. या बैठकीतून कामगारांच्या मागण्यांवर निश्चितपणे तोडगा निघेल, असा आशावाद हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.