सातपूर : बॉश एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष अरुण भालेराव यांच्यावर कामगारांकडून लाखो रुपयांची वसुली करत गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच युनियनच्या जनरल मीटिंगमध्ये कायमचे सभासद रद्द करण्यात आले होते. या प्रकरणाबाबत बॉश कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापनानेही स्वतंत्र चौकशी सुरू करून अंतिम अहवाल प्राप्त होताच भालेराव यांना कंपनीतूनच निलंबित केले आहे. याबाबत व्यवस्थापनाबरोबर कामगार उपआयुक्त कार्यालयातून दुजोरा मिळाला आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
१९ नोव्हेंबरला माऊली लॉन्स, कामटवाडे येथे पार पडलेल्या सभेत बॉश युनियन संघटनेतील भ्रष्टाचार प्रकरणी माजी अध्यक्ष अरुण भालेराव व सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांवर कायमस्वरूपी सभासद रद्द करण्याची कारवाई करण्यात आल्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
खजिनदार योगेश खैरनार यांनी युनियन निधीबाबत सभासदांना माहिती देताना अरुण भालेराव, श्रीकृष्ण कुलकर्णी व नंदलाला आहिरे यांनी युनियन निधीमध्ये कसा अपहार केला व खोटे बिल सादर केले हे पुराव्यानिशी सभासदांसमोर मांडले.
बॉश कंपनीत काम करणाऱ्या एनईटीडब्ल्यू जे युनियनचे सभासद नाहीत अशा कामगारांकडून कंपनी आवारात पैसे गोळा करून लाखो रुपये जमा केले व त्याचा कुठलाही हिशेब न ठेवता अपहार केला.
मागील करारात मंजूर करण्यात आलेल्या कायम होणारे कामगारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये असे ५० लाखांचा अपहार केला. याबाबत युनियन पदाधिकाऱ्यांनी संबंधित माजी पदाधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार केलेला असताना त्यांनी कुठलाही समाधानकारक खुलासा केला नाही, असे विद्यमान अध्यक्षांनी सभेत सांगितले.
सर्व पदाधिकाऱ्यांचे युनियन सभासदत्व आजीवन रद्द करण्यात यावे व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा स्वरूपाचा ठराव कामगारांकडून मांडण्यात आला. सदर ठरावास सर्व सभासदांनी आवाजी मतदानाने व हात वर करून एकमताने मंजुरी दिली.
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच भालेराव यांना कंपनीतूनच निलंबित करण्यात आले आहे.