नाशिक : येथील माळेगाव एमआयडीसीतील हिंदुस्तान ग्लास लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.या कंपनीत काचा तयार केल्या जातात. कंपनीत स्फोट झाल्यानंतर सिन्नर एमआयडीसीसह सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील माळेगाव एमआयडीसीतील काचा तयार करणाऱ्या हिंदुस्तान ग्लास लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला आहे. कंपनीत कामगार अडकले की नाहीत याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र कंपनीत आगीचे प्रचंड लोळ परिसरात पसरले आहे.
आगीची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर एमआयडीसीसह सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सिन्नर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बॉयलरला उशिरा आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे घटनास्थळी सर्वत्र काळा धूर पसरला. कंपनीला लागलेली आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाना पाणी टंचाईला सामोरे जावं लागलं आहे.
कारखान्यातील पाणी उपसणारा पंप वेळेवर सुरु झाला नाही. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी आल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर निमाचे स्थानिक पदाधिकारीही घटनास्थळी पोहोचले. भट्टीत स्फोट होण्याआधी सर्व कामगार बाहेर पळाल्याने ते बचावले, असं सांगण्यात येत आहे.