अंबड : औद्योगिक वसाहतीतील एकेकाळी शान असलेल्या किर्लोस्कर ग्रुपचा कारखाना मध्यंतरी 'इटॉन' या स्विडीश कंपनीने घेतला; पण काही वर्षांत या कंपनीने आपला गाशा गुंडाळत नाशिकमधून पुण्यात स्थलांतर केले. त्यामुळे येथील कामगारांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. आता सहा महिन्यांपूर्वीच 'इटॉन'ने हा कारखाना कोसो इंडिया कंपनीला विक्री केला. कोसो कंपनीने शेकडो कोटींची गुंतवणूक केल्याने काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल, अशी आशा पल्लवित झाली आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
सन १९८९ मध्ये प्रशांत खोसला यांच्या नावे अंबड एमआयडीसीतील ए ११ हा अतिशय मोक्याचा ४२ हजार मीटरचा मोठा भूखंड देण्यात आला होता. काही वर्षांनंतर खोसला यांनी किर्लोस्कर ग्रुप २२ एप्रिल १९९७ ला हस्तांतरित केला. 'किर्लोस्कर'ने यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत पडीत असलेल्या जागेवर इमारत बांधकाम करून आपला विस्तार वाढविला. यात शेकडो कामगारांना काम मिळाले. यातील किमान ५०० पेक्षा जास्त कामगार कायम करण्यात आले.
अतिशय सुगीचे दिवस जात असतानाच जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. भारतानेही जागतिकीकरण उदारीकरणचे धोरण स्वीकारले. याच धोरणामुळे विदेशी कंपन्या भारतात येऊ लागल्या. यातील स्विडीशमधील इटॉन ही कंपनी नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक होती. त्यांना मोक्याच्या ठिकाणी जागा हवी होती; पण राजकीय इच्छाशक्ती नसल्याने ती जागा मिळू शकली नाही. शेवटी एखादी जुनी कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत 'एमआयडीसी'च्याच एका अधिकाऱ्यांनी किर्लोस्कर ग्रुपला ही माहिती दिली. किर्लोस्कर यांनी ही विदेशी गुंतवणूक नाशिकमधून जाऊ नये म्हणून 'किर्लोस्कर'च्या दोन कारखान्यांपैकी हा दुसरा प्रकल्प 'इटॉन'ला १५ जुलै २००८ ला हस्तांतरित केला. या बदल्यात काही व्यवसायांचाही करार करण्यात आला. 'इटॉन'ने हा कारखाना कायम कामगारांसह ताब्यात घेतला, यामुळे कामगारांना अधिक आनंद झाला.
सुमारे साडेचारशेपेक्षा जास्त कायम कामगार असलेल्या या कंपनीने पहिल्या तीन वर्षांसाठी सर्वांत मोठा पगारवाढीचा करार करीत सर्वांना धक्का दिला. यामुळे कामगारांच्या आनंदाच्या पाराला सीमाच उरली नाही; पण हा आनंद मात्र काही औटघटकेचाच ठरला. तीन वर्षांनंतर कंपनीच्या धोरणात अचानक बदल झाला. दुसऱ्या कराराच्या वेळी मात्र कायम कामगारांपैकी निम्म्यापेक्षा जास्त कामगारांना व्हीआरएस व इतर मार्गाने घरी पाठविण्यात आले.
कामगारांची संख्या कमी झाल्यावर राहिलेल्या कामगारांना तरी शेवटपर्यंत नोकरी राहील का, याची शाश्वती राहिली नाही. दोन वर्षांपूर्वी वरिष्ठ व्यवस्थापनाने अचानक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कामगार वर्ग रस्त्यावर आले. कामगारांच्या कायदेशीर देण्याबाबत कामगार उपायुक विकास माळी, तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुजीत शिर्के यांनी तत्कालीन व्यवस्थापक आरती औटी यांच्या मध्यस्थीने प्रयत्न करून तडजोड घडवून आणली.
सहा महिने- वर्षभरानंतर २४ मार्च २०२३ ला प्रख्यात उद्योगसमूह कोसो कंपनीने हा प्रकल्प विकत घेतला. गेल्या काही दिवसांपासून विविध साधनसामग्रीसह इतर रंगरंगोटीची काम सुरू केली आहेत. कोसो कंपनीने शेकडो कोटींची गुंतवणूक केल्याने काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत आता लवकरच या कंपनीला सुगीचे दिवस येतील, अशी आशा पल्लवित झाल्याने औद्योगिक वसाहतीत सकारात्मक पाऊल पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
"इटॉन कंपनीने सदरचा अंबड येथील प्रकल्प कोसो कंपनीला विकला असून, याचे कायदेशीर हस्तांतरण करण्याबाबतची प्रक्रिया करण्यात येत आहे. यामुळे बंद असलेली कंपनी पुन्हा सुरू झाल्यास रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल." - नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, 'एमआयडीसी', नाशिक