कामगाराच्या मृत्यूप्रकरणी एमव्हीएनएल कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

देवळी : स्थानिक औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र विद्युत निगम प्रा. लि. (एमव्हीएनएल) या कारखान्यात बुधवार 22 रोजी अपघात घडून एका कामगाराचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. कारखान्यात सुरक्षा नियमांची काळजी न घेतल्यामुळेच मृत्यू झाल्याची तक्रार मृतक कामगाराच्या भावाने पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद केला आहे असे वृत्त तरुण भारत वृत्तसंस्थेने दिले आहे.

    बायोमासपासून वीज निर्मिती करणार्‍या गुप्ता पॉवर ग्रुपच्या कारखान्यात फिटर दिनेश मोकडे (45) रा. वर्धा व विक्रम तेलरांधे हे दोघे चेन कव्हर मशीनवर कार्यरत असताना ऑपरेशन व्यवस्थापकाने चुकीने मशीन सुरू केल्याने दोन्ही कामगार मशीनमध्ये दबून गंभीर जखमी झाले. MVNLCompany त्यापैकी दिनेशचा शुक्रवार 24 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला तर विक्रम तेलरांधे हा मृत्यूशी झुंज देत आहे. कारखान्यात सुरक्षा नियमांची काळजी न घेतल्यामुळे, कामाचे वर्क परमीट मशीन शट डाऊन न केल्याने व इमरजन्सी स्वीच जवळ हेल्पर न ठेवल्यामुळे दिनेशचा मृत्यू झाला, अशी तक्रार दिल्यानंतर व्यवस्थापक शरद डफले, प्लॉन्ट इंचार्ज नेहरू गांधी, शिफ्ट इंचार्ज अनिल इखार, मेंटनन्स इंचार्ज लुटे यांच्याविरुद्ध देवळी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.