वालचंदनगर (ता.इंदापूर) : येथील वालचंदनगर कंपनीतील व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये समजोत न झाल्यामुळे बुधवार (ता. २२) पासुन वालचंदनगर कंपनीतील कामगारांनी संपाला सुरवात केली. कंपनीमध्ये आयएमडी कामगार समन्वय संघ ही मान्यताप्राप्त कामगार युनियन असून सुमारे ६०० कामगार संघटनेचे सदस्य आहेत. गेल्या काही महिन्यापासुन कंपनीतील कामगार व कंपनीचे व्यवस्थापन यांच्यामध्ये कामगारांच्या थकीत वेतनासाठी चर्चा सुरु आहेत.
थकीत वेतन व कामगारांच्या मागण्यासाठी कामगारांनी १५ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ही केले होते. तसेच ८ ऑक्टोबर रोजी कामगार संघटनेने संपाचा ठराव केला होता.
७ नोव्हेंबर रोजी कामगार संघटनेने कंपनीच्या व्यवस्थापनाला कंपनीला संघटनेचे सर्व कामगारांनी आजपासुन बुधवार (ता.२२) पासुन संपावरती जाण्याचा इशारा दिला होता. कंपनीमध्ये संप हाेवू नये यासाठी गेल्या आठ दिवसापासुन कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी,पोलिस प्रशासनातील अधिकारी कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये तडजोडीसाठी बैठका घेत आहेत.
मंगळवारी (ता.२१ ) रोजी बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांनीही बैठक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश आले नाही. बुधवारी(ता. २१) रोजी सायंकाळी साडेसात वाजता कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार एकत्र जमले होते.त्यांनी संपाचा निर्णय घेतला. बुधवारी रात्रपाळीला जाणारे कामगार कंपनीमध्ये कामावरती गेलेच नव्हते.
बुधवारी (ता.२२) रोजी सकाळी सर्व कामगार एकत्र युनियनच्या कार्यालयासमोर एकत्र जमले होते. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्यासह पोलीस अधिकारी, कमाचारी हजर होते.
कामगारांच्या प्रमुख मागण्या
कामगारांचा रखडलेला वेतनवाढीचा करार त्वरित करावा. कामगारांचे अपग्रेडशन करावे. कंपनीतील व्यवस्थापन व कामगार संबध सुधारणा व कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करणे करावे. कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेमध्येे कंत्राटी कामगारांचा होत असलेला बेकायदेशीर वापर थांबवावा. कामगारांना गणवेश देण्यात यावे या प्रश्न साठी कामगारांनी संप पुकाराला आहे.तसेच कामगारांची थकीत देणी देण्याची मागणी ही कामगार गेल्या कित्येक महिन्यापासुन करीत आहेत.