मुंबई : जे कायदे कामगार संघटनांनी संघर्ष आणि लढय़ातून मिळविले ते बदलण्याचा सरकारने प्रयत्न केला तर कामगार संघटना तो डाव हाणून पाडतील, अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, कामगार नेते, शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर यांनी दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा 76वा वर्धापन दिन आणि दसरा संमेलन महात्मा गांधी सभागृहात थाटामाटात पार पडले. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्यावतीने हा कामगारांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी गं.द. आंबेकर यांच्या कामगार चळवळीतील या निस्पृह कार्याला उजाळा देण्यात आला. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर सचिन अहिर म्हणाले, शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत आम्ही लढत राहू. पात्रतेचे काम लवकरच संपवून म्हाडाने कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावीत. या प्रश्नावर आम्ही लढा उभा केल्यामुळे असंख्य घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईसह देशातील एनटीसीच्या 23 गिरण्यांमध्ये काम करणाऱया 30 हजार कामगारांनी त्यांचे नेतृत्व सचिन अहिर यांच्याकडे सोपवले आहे. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे सल्लागार डॉ. शरद सावंत, निवृत्ती देसाई, आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेव्रेटरी शिवाजी काळे, राजन लाड, संजय कदम, उत्तम गिते, मिलिंद तांबडे, आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी.बी. गावडे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.