ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यास राज्य शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन राज्य शासनाच्यावतीने सकारात्मक पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्यचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

    सोमेश्वर येथे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगाम शुभारंभाप्रंसगी (दि.२४ ऑक्टोबर) ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे आदी उपस्थित होते.

    राज्यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असून ऊसतोड कामगारांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक मार्ग काढून न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्न करण्यात येईल. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी १ रुपयांत पीक विमा, गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह विमा योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.