जनरल मोटर्स युनियन द्वारे आजपासून बेमुदत साखळी उपोषण

तळेगाव,पुणे : जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीचा तळेगाव पुणे मधील प्रकल्प हुंडाई मोटर्सला विकला जात आहे. हा करार होत असताना जनरल मोटर्सच्या १००० कायमस्वरूपी कामगारांचा रोजगार नव्याने येणाऱ्या कंपनीत दिला जात नाही. त्यामुळे हजारो कामगारांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात शासनाकडे न्याय मिळण्याकरता वारंवार बैठकीसाठी विनंती केली जात आहे परंतु शासनाकडून कामगार प्रश्नाचे गांभीर्याने दखल घेतली जात नाही.

     महाराष्ट्र राज्य कामगार कृती समिती व श्रमिक एकता महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 पासून जनरल मोटर्स युनियन द्वारे 1000 कामगारांच्या प्रश्न संदर्भात बेमुदत साखळी उपोषण जुना पुणे-मुंबई हायवे लगत एमआयडीसी रोड वडगाव मावळ येथे करण्यात येणार आहे, या साखळी उपोषणास स्थानिक राजकीय नेते, विविध संघटना यांनी पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती युनियन द्वारे देण्यात आली. 

युनियन द्वारे प्रमुख मागण्या : 

१) नवीन येणाऱ्या हुंडाई मोटर्स कंपनीमध्ये जनरल मोटर्सच्या सर्व कामगारांच्या सेवा शर्तीसहीत नोकऱ्या हस्तांतरित व्हाव्यात. 

२) १००० कामगार व त्यावर अवलंबून असणाऱ्या ५००० लोकांचा निर्माण झालेला जीवन मरणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय हुंडाई मोटर्सला सरकारने कोणतीही परवानगी देऊ नये. 

३) सदर कंपन्यांची डील होण्या संदर्भात दोन्ही कंपनी व्यवस्थापनास माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी बैठकीसाठी वेळ दिला. कार्पोरेटला बैठकी संदर्भात तत्परता दाखवली जात आहे परंतु संघटनेच्या वतीने मागील सहा महिन्यापासून कामगारांच्या प्रश्नसंदर्भात माननीय मंत्री महोदयांच्या भेटी घेऊन माननीय मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठकीसाठी वेळ मागितली असता ती आजतागायत उपलब्ध झाली नाही त्यामुळे या प्रश्नाबाबत लवकरात लवकर बैठक लावून कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा.