पुणे : वडगाव मावळ येथे गेल्या सहा दिवसांपासून जनरल मोटर्स कंपनी व राज्य सरकार यांच्या कडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात जनरल मोटर्स कामगार संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण करीत असलेल्या जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांना राज्यभरातील विविध राजकीय, सामाजिक व कामगार संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
तळेगाव 'एमआयडीसी'त नवीन येणाऱ्या हुंडाई मोटर्स कंपनीमध्ये जनरल मोटर्सच्या सर्व कामगारांच्या सेवा शर्तीसहीत नोकऱ्या हस्तांतरित व्हाव्यात व कामगारांचा प्रश्न सोडविल्याशिवाय हुंडाई मोटर्सला सरकारने कोणतीही परवानगी देऊ नये, आदी मागण्यांसाठी राज्य कामगार कृती समिती व श्रमिक एकता महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मोटर्स कंपनीच्या सुमारे एक हजार कामगारांनी सोमवार (दि.२ ऑक्टोबर) पासून येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
शनिवारी (ता. ७) उपोषणाचा सहावा दिवस होता. गेल्या सहा दिवसांत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, राज्यभरातील विविध कामगार व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी येथे भेट देऊन उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे तसेच वेळप्रसंगी आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीचा तळेगावमधील प्रकल्प हुंडाई मोटर्सला विकला जात आहे. हा करार होत असताना जनरल मोटर्सच्या एक हजार कायमस्वरूपी कामगारांचा रोजगार नव्याने येणाऱ्या कंपनीत दिला जात नाही. त्यामुळे हजारो कामगारांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत न्याय मिळण्यासाठी शासनाकडे वारंवार बैठकीसाठी विनंती केली जात आहे. परंतु सरकारकडून कामगार प्रश्नांबाबत गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, कामगारांना न्याय मिळेपर्यंत ते सुरूच राहणार असल्याची माहिती जनरल मोटर्स कामगार युनियनचे अध्यक्ष संदीप भेगडे व सचिव राजेंद्र पाटील यांनी दिली.