रिएटर कंपनी विरोधात ३५५ कामगार संपावर

लोकप्रतिनिधींचे कंपनीशी साटेलोटे : कामगारांचा आरोप 

सातारा : विंग ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींचा समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रस्ताव केवळ रिएटर कंपनीच्या समर्थनार्थ आहे. आमच्या संपामुळे कोणत्याही प्रकारची अशांतता पसरणार नाही, असे म्हणत रिएटर कंपनीच्या विरोधात कंपनीतील ३५५ कामगारांनी संप संपाची सुरू केला आहे. कंपनीने या दखल न घेतल्यास कंपनी ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढणार असल्याचा इशारा संपकरी कर्मचाऱ्यांनी दिला. यावेळी कामगारांनी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

    कंपनीला संपाची नोटीस दिल्यानंतर संपात फूट पाडण्याच्या हेतूने युनियनच्या दोन पदाधिकाऱ्यासह एकूण ९ कामगारांना तडका फडकी सेवेतून बडतर्फ केले आहेत. ती कारवाई रद्द करावी, कंपनीतील २० कामगारांवर कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करताना कर्मचारी खोटे आरोप लावून चौकशीच्या नावाखाली निलंबित केले आहे. हे निलंबन व चौकशी रद्द करावी, कामगारांना ट्रेनिंग व डेप्युटेशनच्या नावाखाली चंदीगड व कोईमतूर येथे केलेल्या बदल्या रद्द कराव्या आणि कामाच्या ठिकाणी दिली जाणारी अन्यायकारक वागणूक थांबवावी या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप सुरू केला आहे.

    संप व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आरोपावर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली. यावेळी युनियनचे अध्यक्ष किशोर गोळे म्हणाले, संपाची नोटीस ग्रामपंचायतीला दिलेली नाही. आम्ही ग्रामपंचायतीला कोणताही पाठिंबा मागितलेला नाही. संपामुळे शांततेला धोका होईल असे कोणतेच कृत्य वा अनुचित प्रकार मागील संपातही घडला नाही व पुढेही घडणार नाही. समन्वयाने मार्ग निघत नाही, म्हणून संपाचा निर्णय घेतला आहे. 

    ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने व्यवस्थापनाची भेट घेतली, मग समन्वयाने मार्ग का निघाला नाही. युनियन वरखास्त करावी ही व्यवस्थापनाची एकमेव मागणी कामगारांनी मान्य करावी. हे शिष्टमंडळालातील लोकप्रतिनिधींना अपेक्षित आहे का? ही कंपनी मूळची स्वित्र्झलँडची आहे. तिथे जर युनियन आहे तर इथे का नको? आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संप सुरू राहणार आहे. या आंदोलनास कंपनीकडून वेळेत सकारात्मक प्रतिसाद न आल्यास कंपनी ते मंत्रालय असा मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणे मांडणार आहे. यावर तोडगा न निघाल्यास थेट विधान भवनाबाहेरच आंदोलन करणार असल्याचा इशाराही गोळे यांनी दिला.