कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी तालुकास्तरावर केंद्र

जास्तीत जास्त कामगारांना कामगार विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी तालुका स्तरावर लवकरच कामगार नोंदणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.यामुळे नोंदणी वाढून जास्तीत जास्त कामगारांना विविध योजनांचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. कामगार विभागाच्या वतीने शासन आपल्या दारी या सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते  30 रोजी विकास भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, कामगार आयुक्त नितीन पाटणकर, जिल्हा कामगार अधिकारी कौस्तुभ भगत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील गफाट, माजी खासदार सुरेश वाघमारे, कामगार नेते मिलींद देशपांडे, प्रशांत बुर्ले आदी उपस्थित होते.

    ना. खाडे पुढे म्हणाले, उद्योग व्यवसाय, बांधकाम इतर कामांमध्ये (labor registration) कामगारांची भूमिका महत्त्वाची असते. परंतु, या कामामध्ये कामगारांना सन्मान मिळत नाही. त्यांना सन्मान मिळावा व त्यांना लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीने त्यांच्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक कामगारांना मिळावा यासाठी जास्तीत जास्त कामगार नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. वर्धा जिल्ह्यात कामगार भवन निर्माण करण्यासाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यास बांधकामासाठी विभागाच्या वतीने निधी उपलब्ध करुन देऊ, असेही ते म्हणाले. यासोबतच कामगारांच्या कुटूंबाच्या आरोग्यासाठी कामगार रुग्णालय सुरु करण्यात येणार असून यामुळे कामगारांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच कामगारांच्या कुटूंबासाठी विमा पॉलिसी सुरू करणार असल्याचे ना. खाडे म्हणाले.

   कामगारांच्या कुटूंबांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी (labor registration) केंद्र शासनाच्या वतीने कामगार रुग्णालय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे खा. तडस म्हणाले. तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी केलेल्या कामगारांना योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत आहे. या समस्या कामगार विभागाने दूर करुन विभागामध्ये असलेल्या रिक्त जागा भरण्याची सूचना यावेळी आ.डॉ.भोयर यांनी केल्या. या मेळाव्यातून 3 हजार 434 कामगारांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचेही डॉ. भोयर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कामगारांच्या कुटुंबियांना शिष्यवृत्तीचे अनुदान, कामगाराच्या मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान व कामगारांना बांधकाम साहित्याच्या पेटीचे वितरण करण्यात आले.