श्रमिक एकता महासंघ आणि पुणे जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती यांचा भव्य कामगार मेळावा संपन्न
पिंपरी : श्रमिक एकता महासंघ आणि पुणे जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती यांच्यावतीने जनरल मोटर्स तळेगाव, रियटर ई प्रा.ली. शिरवळ, व महिंद्रा GKN शिंटर पिपरी या कंपन्यांमधील कामगारांच्या प्रश्नांवर शनिवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे सकाळी 10 ते 3 या वेळेत भव्य अशा कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यासाठी सीटू चे राष्ट्रीय उपअध्यक्ष डॉ. डी एल कराड, पुणे जिल्हा संयुक्त कामगार संघटना कृती समितीचे व इंटक चे अध्यक्ष श्री. कैलास कदम, कार्यकारणी सदस्य व विश्वकल्याण संघटनेचे अध्यक्ष श्री. दिलीप पवार, कॉम. अजित अभ्यंकर, मानव कांबळे, मारुती भापकर, श्री. वसंत पवार, श्री. अनिल रोहम, श्री. काशिनाथ नखाते ऍड राहुल कामरेकर धनंजय जोशी, श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे, अरविंद श्रौती, व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते,
जनरल मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भेगडे, रियटरचे किरण गोळे, महिंद्रा (GKN) शिंटर चे शिंदे यांनी आपले मनोगत मांडले. मारुती जगदाळे यांनी प्रास्ताविक करून तिन्ही कंपन्यांमधील अडचणी सविस्तरपणे मांडल्या.
डॉ. कराड़ यांनी चुकीचे काम करणारे मंत्री खाड़े यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन एकत्रित पणे जाब विचारण्यासह इतर पद्धतीने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. श्री. दिलीप पवार यांनी जनरल मोटर्स च्या कामगारांना कामावर घेतले तरच हुंडाई मोटर्स चालू होईल नाही तर सर्व कामगारा तर्फे कंपनीला घेराव करून त्याला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला कमिटी अध्यक्ष विद्या तांबे यांनी या आंदोलनात महिलांच्या सहभागाचे कौतुक करून अजून सर्वच संघटनेतील महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. मारुती भापकर, मानव कांबळे कैलास कदम यांनी शासनाचा निषेध करून कायदे बदलाच्या व कामगार विरोधी धोरणावर आवाज उठवण्यासाठी मोठ्या आंदोलनाचे सूतोवाच केले.
ऍड. कामरेकर यांनी कामगार मंत्र्यांनी दिलेले निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगून कामगारांच्या बाजूने न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी यांनी श्रमिक एकता महासंघाच्या व कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार असल्याचे सांगितले त्यामध्ये.
१) जनरल मोटर्स व्यवस्थापन व जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियन मध्ये झालेल्या करारानुसार नवीन येणाऱ्या हुंडाई मोटर्स अस्थापनेमध्ये कायम कामगारांना कायम स्वरूपात चालू सेवाशर्तीसह कायम कामगार म्हणून समाविष्ट करून घेण्यात यावे.
२) जनरल मोटर्स क्लोजर प्रकरणी कामगार मंत्री याना कामगार सेक्रेटरी विनिता सिंघल यांनी चुकीची माहिती देऊन निर्णय घेण्यास भाग पाडले. सदरची कृती संशयास्पद वाटत असल्याने विनिता सिंघल (कामगार सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य) यांना निलंबित करून त्यांची निवृत्त न्यायाधीशमार्फत चौकशी करण्यात यावी. हे जर येत्या पंधरा दिवसात नाही झाले तर औद्योगिक परिसरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यातलाच एक भाग म्हणून जनरल मोटर्स चे एक हजार कामगार कुटुंबियांसह उपोषणाला बसतील अशी मागणी करण्यात येणार आहे.