२८०० कामगारांना मिळणार २४० कोटींची देणी

मुंबई: दिवाळखोरीत गेलेल्या चुनाभट्टीच्या स्वदेशी मिलच्या २८०० कामगारांना तब्बल २२ वर्षांनंतर २४० कोटी रुपयांची कायदेशीर देणी मिळवून देण्यात राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि सर्व श्रमिक संघाला यश आले आहे. त्यामुळे कामगारांना प्रत्येकी कमीत कमी ६ लाख, तर जास्तीत जास्त १९ लाख रुपये इतकी कायदेशीर देणी मिळणार आहेत असे वृत्त लोकमत न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.

      राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर तसेच आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पुढाकारामुळे हे यश मिळाले असल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नुकतीच चुनाभट्टी साईनाथ सेवा मंडळ येथे कामगारांची सभा होऊन सर्वांनी निवाड्याला मंजुरी दिली. सभेला महिला कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी सांगितले की, मुंबईत बंद पडलेल्या स्वदेशी मिलच्या कामगारांचा प्रश्न सोडविणे फक्त बाकी होते. तोही प्रश्न आता मार्गी लागत आहे. कोणताही स्वदेशी मिलचा कामगार न्यायापासून वंचित राहू नये, ही संघटनेची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

      दादा पवार यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर शिवसेनेचे माजी नगरसेवक मच्छिंद्र कचरे, विजय तांडेल यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला मोहन जाधव, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, शिवाजी काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

    सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष उदय भट यांनी स्वदेशी मिलच्या कामगारांना कायदेशीर देणी देण्याचा व्यवहार संपूर्णतः पारदर्शक झाला आहे. कामगारांनी ऐक्य राखणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. तसेच आमदार मंगेश कुडाळकर यांनी ३४ कामगार न्यायालयात गेल्यामुळे हा प्रश्न काही काळ लांबणीवर पडला होता. परंतु अजूनही हे कामगार आपल्या शंकाचे निरसन करून घेऊ शकतात, असे आपल्या भाषणात ते म्हणाले.