पुणे - महावितरणच्या 6 वीज कंत्राटी कामगारांना तातडीने कामावर घेण्याचे आदेश पुणे अप्पर कामगार आयुक्त मा.शैलेंद्र पोळ यांनी 17 मे 2023 रोजी झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र पुणे अप्पर कामगार यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम कंत्राटदार व सातारा महावितरण कंपनी प्रशासनाकडून झाल्याने महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) उप सरचिटणीस राहुल बोडके यांनी पुणे अप्पर कामगार आयुक्त कार्यालया समोर 6 व 7 जून 2023 असे 2 दिवस उपोषण केले असे वृत्त एमपीसी न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.
7 जून रोजी पुन्हा अप्पर कामगार आयुक्त पुणे शैलेंद्र पोळ यांच्या आदेशानुसार सहाय्यक कामगार आयुक्त वाळके यांनी महावितरण पुणे प्रादेशिक विभागाचे सह उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर व संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, दिलीप शिंदे, समीर साबळे यांच्या सोबत चर्चा करून येत्या 10 दिवसात या कामगारांना कामावर न घेतल्यास कंत्राटदार व प्रशासनावर खटले भरू असे लेखी आदेश दिले आहेत . त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन संध्याकाळी अभय गीते कामगार ऊपायुक्त पुणे यांच्या हस्ते सरबत देवुन आमरण उपोषण स्थगित केले आहे. या वेळी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, चंद्रकांत नागरगोजे ई कामगार उपस्थित होते.
महावितरण सातारा व्यवस्थापणाच्या सुचना नसताना बेकायदेशीर पणे 6 कामगारांना केवळ कंत्राटदारा विरोधात आर्थिक अफरातफरीची तक्रार पोलिसात केल्याच्या आकस व सूड भावनेने पोटी कंत्राटदाराने 1 जानेवारी 2023 पासून या कामगारांना कामावर घेतले नव्हते.
त्यामुळे या बाबतीत ऊर्जा मंत्री यांनी लवकरच महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ संलग्न (भारतीय मजदूर संघ) समावेत चर्चा करून सकारात्मक निर्णय न घेतल्यास संघटना पावसाळी अधिवेशनात भव्य मोर्चा काढणार असल्याची इशारा संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी उपोषण स्थगित च्या वेळी दिलेला आहे.