नगर : शहरातील आस्थापनांकडून कामगारांची पिळवणूक केली जात असून कामगारांना विमा, पीएफच्या सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. या सर्व आस्थापनांची तपासणी करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने कामगार आयुक्तांकडे केली आहे असे वृत्त सामना वृत्तसंस्थेने दिले आहे.
या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरातील विविध आस्थापना, दुकाने या ठिकाणी जे कामगार काम करतात, त्या कामगारांना 12 तास काम देऊन 9 तासाचा पगार अदा करतात व जास्तीची ओव्हर टाईम ड्युटी केल्याबद्दल उर्वरित पगार दिला जात नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार साधारण व्यक्तीला आठ तास ड्युटी करणे करावी. त्या संदर्भात कुठेही कार्यवाही होताना दिसत नाही, तसेच नगर शहरातील 99 टक्के दुकानदार, आस्थापना, संस्था, मॉल, छोटे-मोठे किरकोळ व्यापारी या ठिकाणी सुद्धा कामगार काम करत असतो आणि काम करत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा विमा, पीएफ दिला गेलेला दिसत नाही.
आपल्या शासकीय ऑफिस मार्फत त्या ठिकाणी सुद्धा कुठेही चौकशी दंड किंवा पीएफ इन्शुरन्स या संदर्भात कारवाही करताना शासकीय अधिकारी दिसून येत नाही. त्यामुळे आपण यात स्वतः लक्ष घालावे व नगर शहरातील विविध कामगारांना या ठिकाणी पीएफ विमा संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करावे. सदरची कारवाई लवकरात लवकर जलद गतीने न झाल्यास त्या ठिकाणी शिवसेना माथाडी व कामगार सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा कामगार सेनेचे शहरप्रमुख गौरव ढोणे यांनी दिला आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, महेंद्र तिवारी, भगवान कोकणे, साजीद शेख आदी उपस्थित होते.