कंत्राटी कामगार व त्यांचे कंत्राटदार यांचे ऑडीट करणेची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये 10 हजारांहून अधिक कामगार कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत मनपाचे अधिकारी आणि बहुतांश लेबर काॅन्ट्रॅक्टर संगनमताने आणि सर्रासपणे कामगार  कायदा धाब्यावर बसवुन कंत्राटी कामगार व मनपाची फसवणूक करीत आहेत त्यामुळे कंत्राटी कामगार व त्यांचे कंत्राटदार यांचे ऑडीट करावे अशी मागणी केल्याचे हनुमंत लांडगे प्रदेश सरचिटणीस, भाजपा महाराष्‍ट्र (कामगार सेल) यांनी सांगितले. 

    हनुमंत लांडगे म्हणाले कि, कामगारांना दरमहा वेळेवर न पगार देणे, बहुतांश विभागात तीन-तीन महीने पगार न देणे, निर्धारित संख्येपेक्षा कमी कामगारांकडून काम करुन घेणे, कामगारांना नियुक्तीपत्र, ईएसआय, पीएफ, पगार स्लिप, किमान वेतन, वैद्यकीय सुविधा, अपघात विमा, गणवेश, सुरक्षा साधने, ओळखपत्र न देणे, बायोमेट्रिक हजेरीपत्रक न ठेवणे, कत्रांटी कामगारांना दंडात्मक वसुलीसाठी नेमणे (ज्यामुळे आर्थिक भ्रष्टाचारांची शक्यता असते), मनापाच्या कंत्राटी कामगारांकडून अधिकाऱ्याची घरची कामे करुन घेणे अशाप्रकारचा गैरप्रकारचा सध्या सुळसुळाट झाला असलेने तो उघडकीस आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने छ. संभाजीनगर मनपाच्या धर्तीवर कंत्राटी कामगार व त्यांचे कंत्राटदार यांचे  कामकाज व आर्थिक बाबीचे ऑडीट करणेत यावे अशी मागणी करण्यात आल्याची माहिती हनुमंत लांडगे यांनी दिली.