सातारा : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत देण्यात येणारा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार सन २०२१-२०२२ मांढरदेव, ता. वाई येथील शंकर दौलतराव मांढरे यांना जाहीर झाला आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुंबई येथे होणार आहे.
मांढरे हे वाई येथील गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड या कंपनीमध्ये सन १९९५ पासून मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. तसेच कामगार संघटनेच्या विविध पदावर गेली २० वर्षांपासून ते कार्यरत आहेत. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमांबरोबरच वाई एमआयडीसीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून कामगारांसाठी घरे बांधली. तसेच कामगारांसाठी विविध उपक्रम राबवून कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. मांढरे हे मांढरदेव ग्रामपंचायतीचे सदस्य व उपसरपंच राहिले आहेत. तसेच त्यांनी वाई तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक पद भूषवले आहे. आ. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी गावात अनेक विकासकामे केली.
या पुरस्काराबद्दल शंकर मांढरे यांचे आ. मकरंद पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, किसनवीर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे, वाई सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मोहन जाधव, गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडचे वरीष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी विवेक कुलकर्णी, मोहन मोने, प्रबोध कामत, अरविंद कुलकर्णी, वैभव जोशी, नवनाथ सुर्यवंशी यांनी अभिनंदन केले.
