पिंपरी-चिंचवड : १ मे जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून बदलते कामगार कायदे व कामगारांविषयी सरकारची उदासीनता व भांडवल धरतीने धोरण याविषयी कामगारांमध्ये जागृती निर्माण करून कामगार चळवळीला दिशा देण्याच्या दृष्टीने सोमवार दि.१ मे २०२३ रोजी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
महा रॅली सकाळी ८:३० वाजता विश्व कल्याण कामगार संघटना ऑफिस बजाज ऑटो आकुर्डी येथे श्रमिक एकता महासंघाशी संलग्न असणाऱ्या सर्व संघटना व सभासद एकत्र येतील व सर्वजण कार्यालयाच्या गेटवरून दुचाकीने महा रॅली आकुर्डी येथील शाहीर कॉम्रेड दत्ता पाडळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे चिंचवड मार्गे पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून पुढे खराळवाडी मार्गे एच ए कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे नाशिक फाटा कासारवाडी फुगेवाडी येथून पुढे सँडविक एशिया कंपनीच्या गेटवरून पिंपरी चिंचवड येथून पुढे रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे सर्वजण एकत्र येतील.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डी. एल. कराड (अध्यक्ष सि टी यु) हे उपस्थित राहणार आहेत श्रमिक एकता महासंघाच्या वतीने १. श्री. संजयजी शिंघवी हायकोर्ट वकील यांना कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार, २. श्री. मोहन पाटील व्यवस्थापकीय अधिकारी बॉस चासिस यांना राजर्षि शाहू महाराज पुरस्कार व ३. श्री. पांडुरंग कचरे श्रमिक एकता महासंघाचे माजी उपाध्यक्ष यांची पुणे जिल्हा नियोजन कमिटी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्काराने सन्मानित करण्यात येईल. तसेच कर्तव्यदक्ष संघटना म्हणून १) जनरल मोटर्स युनियन २) केअर इशेंन्शियल युनियन ३) रिएटर एम्प्लॉईज युनियन ४) प्रीमियर एम्प्लॉईज युनियनला सन्मानित करण्यात येणार आहे तसेच विशेष सत्कार पांडुरंग कचरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सल्लागार दिलीप पवार, अरविंद श्रोती, श्री. मारुती जगदाळे श्री. केशव घोळवे उपस्थित राहून मार्गदर्शन करतील तसेच श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री. किशोर सोमवंशी, ज. सेक्रेटरी श्री. रोहित पवार व संपूर्ण कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित राहतील.
