सुरक्षा रक्षकांच्या पगार वाढीसाठी अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

पुणे : महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ (संलग्न भारतीय मजदूर)ने सुरक्षा रक्षकांची प्रलंबित वेतनवाढ व इतर मागण्या विषयी सोमवारी (दि.13) शिवाजीनगर येथील अप्पर कामगार आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन केले असे वृत्त एमपीसी न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.

    या आंदोलनात भारतीय मजदुर संघाचे केंद्रीय पदाधिकारी अण्णा धुमाळ, प्रदेश संघटनमंत्री श्रीपाद कुटासकर, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे, जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव बाळासाहेब भुजबळ, महासंघाचे महामंत्री, ॲड.विशाल मोहिते, कार्याध्यक्ष अनिल पारधी, संघटनमंत्री अविनाश मुंढे, उपाध्यक्ष शंभु खंडाळे व महासंघाचे जिल्हाध्यक्ष युवराज नाळे, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, मिना अढारी व प्रदेश मीडिया प्रमुख सागर रूपटक्के, तुकाराम कुंभार आदी उपस्थित होते.

     कामगारांना महागाई च्या प्रमाणात वेतन वाढ त्वरित मिळाली पाहिजे या बाबतीत संघटनेने राज्य सरकार, मंडळ कडे मागणी पत्र दिलं आहे. मात्र शासन या बाबतीत चर्चा, निर्णय करायला ही तयार नाही . शासनाने, प्रशासनाने डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे ही पट्टी काढुन त्वरित मागील फरका सहित वेतन वाढ करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ कामगार मंत्री, यांच्या घरा समोर तिव्र निदर्शने करण्याचा ईशारा संघटनेचे सरचिटणीस ॲड.विशाल मोहिते यांनी कामगार उपायुक्त यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात पुढील मागण्या मांडण्यात आल्या :

  • 20 टक्के दराने फरकासह वेतनवाढ देण्यात यावी

  • राष्ट्रीय सुट्ट्यांचे वेतन दुप्पट दराने देण्यात यावे.

  • नैमित्तिक रजा,अर्जित रजा या लागू करून यांचे वेतन घरभाडे भत्ता सह देण्यात यावे.

  • बेरोजगार सुरक्षा रक्षकांना किमान वेतन घरभाडे भत्तासह देण्यात यावे.

यावेळी उपायुक्त अभय गीते यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच यावर कार्यवाही सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.