कामगारांचे शोषणाबाबत कामगार अप्पर आयुक्त यांना निवेदन

उद्योगामध्ये कार्यरत असंख्य कामगार यांना कायम केले जात नाही तसेच कामगारांना कायद्यानुसार सर्व हक्क, फायदे मिळत नसून कामगारांचे शोषण केले जाते याबाबत लेखी निवेदन कामगार नेते सयाजीराव पाटील, प्रकाशदादा मुगडे, बापूसाहेब कांबळे यांनी अप्पर आयुक्त पुणे कार्यालय येथे निवेदन दिले.

      निवेदनात म्हटले आहे कि, सातारा येथील उद्योगांमध्ये आजमितीस असंख्य कामगार कार्यरत आहेत. सदर उद्योगातील बहुतांश कामगार गेली अनेक वर्षे सलग सेवेत आहेत. सदर कामगार करीत असलेले काम हे कायमस्वरूपी व नियमित उत्पादनाचा भाग आहे. या सर्व कामगारांना कायम कामगारांचे फायदे दिले जात नाहीत. सदर कामगारांना बेकायदेशीरपणे तात्पुरते/बदली/कंत्राटी कामगार म्हणून वर्षानुवर्षे ठेवले जात आहे. तसेच सदर कामगारांना अत्यंत कमी पगारावर काम करणे भाग पाडले जात आहे. किमान वेतन कायद्यातील तरतुदींचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. काम,कामाची जागा ,ठिकाण परिसर आरोग्यदायी ,सुरक्षित असल्याने कामगारांचे आरोग्यास धोका असूनही त्या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे . तरी कामगारांना कायद्यानुसार सर्व हक्क, फायदे मिळणे गरजेचे असून कामगारांचे शोषण थांबले पाहिजे असे निवेदन अप्पर कामगार आयुक्त कार्यालय येथे देण्यात आल्याची माहिती कामगार नेते सयाजीराव पाटील यांनी दिली.